सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teachers Award) मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disley) गुरुजी यांची जागतिक बँकेने (World Bank) सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बॅंकेच्यावतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी  ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत उपक्रमाला चालना देण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची मानण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील मुलांच्या शैक्षणिक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तीची सल्लागार म्हणून निवड केली आहे. या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणाऱ्या 21व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजी यांनी सांगितले.



ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा गौरव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.


डिसले गुरुजी ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 चे विजेते आहेत. सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली होती. दरम्यान, या पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना दिली. यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल, असा त्यांचा मानस आहे.



Ranjit Singh Disale हे ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. आता जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती करण्यात आल्याने सोलापूरसह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डिसले गुरुजी यांच्या नावाने इटलीत विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. (Ranjit Singh Disale Scholarships ) कार्लो मझोने- रणजितसिंह स्कॉलरशिप या नावाने 400 युरोंची ही शिष्यवृत्ती इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.