`तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन लखपती झालात`; एकाच व्यासपीठावर रावसाहेब दानवे आणि सत्तारांमध्ये टोलेबाजी
रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार याच्यामध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली.
Sambhaji nagar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. संभाजी नगर पासून तर सिल्लोड पर्यंत तब्बल सात ते आठ ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)आणि अब्दुल सत्तार एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्याआधी सिल्लोडच्या मुख्य रस्त्यावर दोघांकडून रोड शो देखील करण्यात आला.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या टोलेबाजी पाहायला मिळाली. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन लखपती झालात पण मी लोकपती आहे असा टोला रावसाहेब दानवेंनी लगावला. यावर अब्दुल सत्तार यांनीही प्रत्युत्तर दिलं.
"अब्दुल सत्तार आता एकनाथ शिंदे यांचा चांगला उपयोग करुन घ्या. सिल्लोडचा विकास कराच पण ज्यांना पक्षात आणायचं आहे त्यांच्याकडेही लक्ष द्या. तुमचं आणि माझं रामायण कधीच संपणार नाही," असे रावसाहेब दानवे म्हणाले.
"तुम्ही आता मुख्यमंत्र्यांकडून पैसे घेऊन लखपती झाला आहात. तुम्ही लखपती आहात तर मी लोकपती आहे. दवाखान्यात राहून मी निवडून आलो हे लक्षात ठेवा," असेही दानवे म्हणाले.
यावर प्रत्युत्तर देताना तुम्ही दवाखान्यात असताना आम्ही प्रचार करत होतो असे अब्दुल सत्तार म्हणाले.
आमच्या दोघांचा रिमोट कंट्रोल आता एकनाथ शिंदे - अब्दुल सत्तार
दानवे आणि सत्तार एकत्र झाले तर मराठवाड्यात काय होवू शकते ते बघा आता. आमच्या दोघांचा रिमोट कंट्रोल आता एकनाथ शिंदे आहेत. आम्हां दोघांत वाद होवू नये याची काळजी अर्जून खोतकर घेतील, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
पंतप्रधान मोदींचे फोटो लावून निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा, मीही राजीनामा देवून निवडणुकीला सामोरे जातो, असा इशारा सत्तार यांनी दिला आहे.
गेल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात ज्या फाईली रखडल्या होत्या त्या दहा दिवसांत या मुख्यमंत्र्यांनी सर्व फाईलींवर सह्या केल्या मी उद्या फॅक्सने राजीनामा पाठवणार. मुख्यमंत्री स्विकारतील की नाही माहिती नाही असेही सत्तार म्हणाले.