मुंबई : अजित दादांनी पत्र दिले तेव्हा त्यांच्याकडे गटनेतेपद होते. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांचे गटनेतेपद रद्द केले. पण अजूनही अजित पवारच गटनेतेपदी आहेत. त्यामुळे अजित पवारांचा व्हीप राष्ट्रवादीचे आमदार नाकारू शकत नाही असे भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. राज्यपालांनी घटनात्मक तरतूदींचे पालन न केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण कोर्टाने त्यांची कोणतीही दखल घेतली नसल्याचेही त्यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना आमदारांना हॉटेलातून फिरवत आहेत. एकीकडे राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट असताना भाजपाचे आमदार त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. पण काँग्रेस,शिवसेनेचे आमदार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून बिनबुडाचे आरोप करत असल्याचे दानवे म्हणाले.  



संजय राऊतांना वेड लागले असून त्यांना आता वेड्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवे. काय बोलायचे आणि काय बोलू नये हे त्यांना कळत नाही. ज्या कपिल सिब्बलांनी यांची बाजू मांडली त्याच सिब्बलांनी राम हा काल्पनिक आहे, वास्तविक नाही अशी भूमिका त्यांनी मांडली होती. याआधी शिवसेनेने सिब्बल यांची मदत घेतली आहे. 


काँग्रेसने अजून गटनेता निवडला नाही. जोपर्यंत गटनेता निवडला जात नाही तोपर्यंत राज्यपालांना अशाप्रकारे पत्र देता येत नाही. राष्ट्रवादीने निवडलेला गटनेता भाजपा सोबत आहे. अशावेळी राज्यपालांनी काय निर्णय घ्यावा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पण हे सरकार पूर्णकाळ राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.