ठाणे : ठाण्यात रॅपिड ऍक्शन फोर्सची एक कंपनी दाखल झाली आहे. 120 जवानांची एक तुकडी ठाणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. पुणे येथून ही टीम आज ठाण्यात दाखल झाली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, श्रीनगर, कळवा, मुंब्रा आणि डायघर परिसरात ही तुकडी तैनात असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅपिड ऍक्शन फोर्सची टीम ठाण्यात दाखल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय पोलीस दलाच्या एकूण १० तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. ज्यामध्ये रॅपिड अॅक्शन फोर्सच्या ५ तुकड्या , CISF च्या ३ तुकड्या आणि CRPF च्या २ तुकड्यांचा समावेश आहे. या तुकड्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे तैनात करण्यात येणार आहेत.


कोरोनामुळे राज्यातील पोलिसांवरचा ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. राज्य सरकारने केंद्राकडे तशी मागणी केली होती.


दरम्यान ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाच्या 154 रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या 2172 वर पोहोचली आहे. आज 82 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 838 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 67 जणांचा मृत्यू झाला आहे.