मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललीये. काळजी करण्याजोगं म्हणजे देशात एका दिवसात जेवढे कोरोना रुग्ण सापडताहेत, त्यातले 50टक्क्यापेक्षा जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत,  त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन  लागतो की काय अशी भीती व्यक्त होते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भीती खरी तर ठरत नाहीये ना, अशी शंका आता यायला लागली आहे. कारण महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. गेल्या 4 दिवसांपासून दररोज 15 हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढतायत.


- रविवारी राज्यात 16 हजार 620 नवे रुग्ण आढळून आलेत. 
- यापूर्वी 1 ऑक्टोबरला 16 हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडले होते. 
- दर आठवड्याचा रुग्णवाढीचा दर 33 टक्क्यांच्या घरात जाऊन पोहोचलाय. 
- मुंबईत रविवारी 1 हजार 963 रुग्ण वाढले आहेत.
- ही गेल्या 5 महिन्यांतील सर्वात मोठी रुग्णसंख्या वाढ ठरलीये. 
- राजधानीप्रमाणेच उपराजधानी नागपूरही रेड झोनमध्ये असल्याचं दिसतंय. 
- सप्टेंबर-ऑक्टोबरच्या तुलनेत कमी असलेला मृत्युदर हीच काय ती दिलासादायक बाब म्हणावी लागेल.


राज्याच्या अनेक भागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागतो की काय, अशी भीती व्यक्त होते आहे. आरोग्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची शक्यता फेटाळली असली तरी मुंबईच्या महापौरांनी मात्र नाईट कर्फ्यूचे संकेत दिले आहेत. 


ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगची यंत्रणा अधिक योग्य पद्धतीनं राबवावी लागणार आहे. ही जशी प्रशासनाची जबाबदारी आहे, तशीच नागरिकांनीही जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे. तसंच होतोना दिसत नाहीये. बाजारांमध्ये गर्दी कायम आहे. मास्कशिवाय फिरणारे लोक दिसताय. कोरोनाची दुसरी लाट राज्याच्या दरवाजावर धडक देत असताना नियम मोडणं तिला निमंत्रण देणारंच ठरणार आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ द्यायची नसेल, तर प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे.