सातारा : पर्यटनासाठी अनेकांच्या पसंतीच्या ठिकाणांमध्ये समाविष्ट असणारं महाबळेश्वर आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलं आहे. हे कारण म्हणजे येथील कोणतं पर्यटनाचं आकर्षक ठिकाण किंवा तिकडचं वातावरण नसून एक वन्य जीव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाबळेश्वर येथे असणाऱ्या प्रतापगड परिसरात नुकतंच ब्लॅक पँथरचं दर्शन घडलं. ज्यामुळं पुन्हा एकदा या भागात असणाऱ्या वन्यजीव संपदेबाबत वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासकांनी कुतूहल व्यक्त केलं आहे. ब्लॅक पँथर दिसत असल्याचा व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 


वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कुमठे गावातील 2 मेंढपाळ, रविंद्र जाधव आणि सुभाष जाधव यांनी त्यांच्या जनावरांना चरण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी नेलं होतं. तेव्हाच त्यांना इथं ब्लॅक पँथर दिसला'. 


17 सप्टेंबरला अगदी दूरूनच या ब्लॅक पँथरचा व्हिडीओ चित्रीत करण्यात आला. ज्यामध्ये पूर्ण वाढ झालेला हा वन्य जीव डोळ्यांचं पारणं फेडत आहे. मेंढपाळांचा आवाज ऐकल्यानंतर लगेचच तो दिसेनासाही होत आहे. माणसाची चाहूल लागताच हा पॅथर दिसेनासा झाला खरा. पण, त्याच्या असण्याची चाहूल येथील परिसरात अनेक चर्चांसोबत दहशतीलाही वाव देऊन गेली आहे. 


महाबळेश्वर आणि सदरील नजीकचा परिसर घनदाट जंगलांनीही वेढलेला आहे. त्यातच डोंगररांगांनी इथं अनेक वन्य जीवांना आसराही दिला आहे. ज्यामुळंच या ब्लॅक पँथरचं दर्शन घडलं असल्याचं बोललं जात आहे. 



दरम्यान, 2018 मध्ये मे महिन्याच्या सुमारास एकदा बेल्जियममधील एका कुटुंबाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये या melanistic leopard म्हणजेच ब्लॅक पँथरचं दर्शन घडलं होतं. सहसा हा प्राणी कोकण पट्टा, गोवा आणि कर्नाटकातील काबिनी भागात दिसतो. पुढे 2020 मध्ये ब्लॅक पँथर मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात दिसला होता.