आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: चंद्रपुर जिल्हा हा खनिजे, धातू आणि जिवाश्म ह्यामुळे समृध्द आहे. नुकतेच जिल्ह्यात सोने, तांबे आणि मौल्यवान धातू आढळत आहेत. अशातच जिल्ह्यात फुलगुराईट हे विजाश्म आढळल्याचा दावा भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी केला आहे. पावसाळ्यात सगळीकडे विजा पडतात. त्यामुळे अनेकदा वन्यजीव आणि मानव ह्यांचा मृत्यू होतो. परंतु वीज पडून फुल्गुराईट (Fulgurite) नावाचा मौल्यवान खडक तयार होतो हे फारसे कुणाला माहिती नाही. सर्वच ठिकाणी हा विजाश्म खडक (Fossilized Lightning) तयार होत नाही. मात्र जिथे रेती किंवा वाळू असेल तिथेच हा खडक तयार होतो. नदी नाल्यात वीज पडल्यास तो जमिनीच्या आत तयार होत असल्याने कुणाला फारसा दिसत नाही. अनेक वर्षानंतर तो दिसला तरी कुणाला हा मौल्यवान खडक ओळखता येत नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या किनारी असे अनेक खडक आढळले आहेत. विजाश्म (fossilized lightning) किंवा विजेचा खडक म्हणून ओळखले जाणारा हा खडक वीज पडून तयार होतो. (Rare fulgurite found near Chandrapur)


काय आहे यामागचं विज्ञान? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजेमध्ये 100 मिल्लीयन व्होल्ट आणि 25,000 डिग्री तापमान असते ज्यामुळे  जमिनीतील सर्व खनिजे वितळून काच किंवा नवीन अश्म आकार घेतात. ज्या जमिनीत वाळू, खनिज किंवा वाळू मिश्रित चुनखडक असतो त्याठिकाणी खूप चांगला विजाश्म तयार होतो. विजेच्या प्रचंड उष्णतेमुळे जमिनीतील खडकावर वृक्षाकार आकार आणि जमिनीतील वाळूच्या  गोल, पोकळ किंवा घट्ट लांबीच्या नळी च्या आकारांचे खडक तयार होतात. जगात आतापर्यंत आढळलेले विजाश्म हे 16 फुट लांब आंनी एक फुट जाडीचे फुल्गुराईट आढळले आहे. वाळू आणि वाळवंट क्षेत्रात खूप चांगल्या आकारांचे खडक तयार होतात. 


भौगोलिक रचना आणि विज्ञान 


नदीचे, नाल्याचे पात्र, नदीचे तीर इथे असे विजाश्म सापडू शकतात परंतु हे खडक जमिनीत वरपासून खाली 50 फुट खोलपर्यंत तयार होतात त्यामुळे लवकर सापडणे कठीण असते. विजाश्मांचे 5 प्रकार आढळतात त्यात वाळू, माती, चुनखडक, खडक आणि काच ह्यासारखे फुल्गुराईट आढळतात. एखाद्या क्षेत्रात कितीदा विजा पडल्या हे ह्या खडकावरून सांगता येते. विजाश्मामुळे प्राचीन काळातील हवामान कसे होते ते कळते. ह्यातून नवीन खनिजे आणि विविध आकाराचे मौल्यवान खनिजे मिळतात. जगातील अनेक देशात फुल्गुराईट गोळा केल्या जाते आणि महागड्या किमतीने विकल्या जाते. विजेच्या प्रचंड शक्तीतून तयार झालेल्या ह्या खडकात प्रचंड ऊर्जा आणि शक्ती असून ह्या खडकात चमत्कारिक शक्ती असते असे मानले जाते.