Siddhivinayak Temple: मुंबईतील प्रसिद्ध व हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सिद्धिविनायक मंदिराचे प्रसाद जिथे ठेवले जातात तिथे उंदराची पिल्ले आढळली असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळं प्रसाद स्वच्छ ठिकाणी ठेवले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंबंधीत एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. महाप्रसादाचे लाडू जिथे ठेवले जातात त्या ट्रेमध्ये उंदराची पिल्ले आढळली आहेत. त्यामुळं मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील लाडूंच्या शुद्धतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. एका मोठ्या ट्रेमध्ये प्रसादाचे लाडू ठेवण्यात आले असून त्यात मेलेला उंदीर असल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओनंतर एकच खळबळ उडाली आहे. 


 सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सचिव वीणा पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. व्हायरल व्हिडिओ व फोटोची तपासणी केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. आमच्याकडे परिसर स्वच्छ असतो. इथे असं घडण्याची शक्यताच नाही. उकीरड्यावर काहीतरी फेकलं असेल आणि त्याचा फोटो व व्हिडिओ घेतले असावेत, असं आम्हाला वाटतं. आम्हाला ज्यावेळेला माहिती मिळाली तेव्हा आम्ही कॅमेऱ्या तपासले तेव्हा आम्हाला काहीच आढळलं नाही. हा फेक व्हिडिओ दिसतो. कोणीतरी बदनाम करण्याच्या उद्दष्टाने हे केलं असावे. ज्याने कोणीतरी हे केलंय त्याच्यावर कारवाई होण्याची गरज आहे, अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दिली आहे.



सिद्धिविनायक मंदिरात दररोज सुमारे ५० हजार लाडू बनवले जातात. प्रसादाच्या एका पाकिटात प्रत्येकी ५० ग्रॅमचे दोन लाडू असतात. सणासुदीच्या काळात प्रसादाची मागणी वाढते. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यापूर्वी अन्न व औषध विभागाचे अधिकारी नियमितपणे या लाडूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांची तपासणी करून ते सर्टिफाइड करतात. प्रयोगशाळेच्या चाचणी अहवालानुसार हे लाडू सात ते आठ दिवस साठवून ठेवता येतात. ते खराब होत नाहीत मात्र लाडवांच्या ट्रेमध्ये उंदीर असल्याचे फुटेज समोर आल्यानंतर मंदिरातील प्रसादाच्या स्वच्छतेबाबत आणि शुद्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.