Ratan Tata Aditi Bhosale Startup: भारतीय उद्योग जगतामधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक म्हणजे टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata). खरं तर आपल्यापैकी अनेकांनी रतन टाटांचे अनेक किस्से ऐकले असतील. त्यांचं दातृत्व, सर्वसामान्यांना दिलेली वागणूक कायमच चर्चेत असते. असाच अनुभव आदिती भोसले-वाळुंज (Aditi Bhosale Walunj) आणि चेतन वाळुंज (Chetan Walunj) या मराठमोळ्या दांपत्याला आला. हे दोघेही इंधन पुरवठा करणारी स्टार्टअप कंपनी 'रेपोस एनर्जी'चे (Repos Energy) संस्थापक आहेत. मात्र त्यांना त्यांचे आदर्श असलेल्या रतन टाटांकडून मार्गदर्शन हवं होतं. आपल्या कंपनीची भरभराट व्हावी यासाठी रतन टाटांकडून काही मार्गदर्शन मिळाल्यास बरं होईल असं या दोघांचं मत होतं. काहीही झालं तरी रतन टाटांची भेट घ्यायची असं या दोघांनी ठरवलं होतं. अखेर त्यांना रतन टाटांना भेटण्याची संधी मिळाली. मात्र ही संधी सहज मिळाली नाही. वयाच्या 90 मध्ये असलेले रतन टाटा आजही त्यांच्या दिनक्रमामध्ये फार व्यस्त असतात. मग असं असताना या दोघांना नेमकी टाटांना भेटण्याची संधी कशी मिळाली आणि काय जालं जाणून घेऊयात.


काय करते ही कंपनी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेतन आणि अदिती हे दोघे 'रेपोस एनर्जी' नावाची कंपनी चालवतात. कार्बन फुटप्रींट कमी करण्याचं या दोघांचं ध्येय आहे. पारंपारिक इंधनाच्या मदतीनेही हे शक्य आहे असं या दोघांना वाटतं. एकाच छताखाली सर्व प्रकारचे इंधन तयार करुन तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचं वितरण करण्याचं या दोघांचं ध्येय आहे. त्यांना हे सारं परवडेल अशा किंमतीमध्येच करायचं आहे. त्यांनी 2017 साली आपली कंपनी टाटा समुहाच्या सौजन्याने सुरु केली. मात्र यापूर्वी त्यांना टाटांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. 


कोणतीही व्यवसायिक डिग्री नाही


लिंक्डइनवरील पोस्टमध्ये भोसलेंनी या भेटीबद्दलची माहिती दिली होती. टाटा हे काही तुमचे शेजारी नाही जे तुम्हाला कधीही भेटतील. आमची जेव्हा भेट झाली तेव्हा ते टाटा समुहाचे अध्यक्ष होते. वाळुंज दांपत्याकडे बिझनेस स्कूलची कोणतीही बदवी नव्हती. त्यामुळे त्यांना हा उद्योग सुरु करण्यासाठी संघर्ष करावा लागला.


भेट होणार नाही असं वाटलं...


वाळुंज दांपत्याने आपल्या या स्वप्नासंदर्भातील थ्री डी प्रेझेन्टेशन दिलं आणि त्यांना टाटांच्या भेटीची संधी मिळली. त्यांनी आधी टाटांना स्वत:च्या हस्ताक्षरामधील पत्र पाठवलं. टाटा हे आपल्या दैनंदिन कामांसाठी ज्या व्यक्तींवर अवलंबून असतात त्यांच्याही या दोघांनी भेटी घेतली. त्यांना रतन टाटांना त्यांच्या मुंबईतील घरी भेटायचं होतं. यासाठी हे दोघेही तब्बल 12 तास थांबले होते. मात्र त्या दिवशी रतन टाटा फार व्यस्त होते. आज आपली काही भेट होणार नाही असं वाटल्याने हे दोघे पुन्हा हॉटेलवर परतले.


"हॅलो, मी रतन टाटा बोलतोय..."


मात्र त्यानंतर तासाभरात त्यांना एक फोन आला. "हाय, मी आदितीशी बोलू शकतो का," असं समोरच्या व्यक्तीने विचारलं. "मी रतन टाटा बोलतोय. मला तुमचं पत्र मिळालं. आपण भेटू शकतो का?" असं फोनवरुन विचारण्यात आलं. अदिती यांना जे काही घडत होतं त्यावर विश्वास बसत नव्हता. रतन टाटांसारखा मोठा माणूस थेट आपल्याला फोन करु शकतो यावर आदिती यांना विश्वास बसत नव्हता.



1000 हून अधिक बिझनेस पार्टनर


लवकरच या दोघांची टाटांशी भेट झाली आणि त्यांनी प्रेझेन्टेशन दिलं. या दोघांच्या कंपनीमध्ये रतन टाटांनी एकदा नाही दोनदा गुंतवणूक केली. रेपोस ही सध्या भारतामधील 188 शहरांमध्ये सेवा देते. आता त्यांचे 1000 हून अधिक बिझनेस पार्टनर आहेत. मे 2022 मध्ये कंपनीला टाटा ग्रुपकडून 56 कोटींचा निधी मिळाला. आता ही कंपनी भारतभरात काम करते आणि या कंपनीला यंदाच्यावर्षी 185 कोटी रुपयांचा नफा होणं अपेक्षित आहेत.


आमचं भाग्य...


"रतन टाटा हे आमचे पहिले गुंतवणूकदार झाले हे आमचं भाग्य आहे. मागील वर्षी आम्ही 65 कोटींचा व्यवसाय केला. आता आमचा उद्योग मोठा होत आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात आम्ही अंदाजे 185 कोटींपर्यंतची मजल मारु," असं अदिती यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. अदिती आणि त्यांचे पती मूळचे पुणेकर आहेत.


2000 मोबाईल फ्युएल स्टेशन्स


अदिती यांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल फ्युएल स्टेशन्सची सुविधा त्यांची कंपनी देते. हे एखाद्या एटीएमप्रमाणेच आहे. ही कंपनी घरपोच इंधन पुरवते. इंधनाची चोरी आणि इंधनाच्या वापरावर ही कंपनी नजर ठेवते. या कंपनीचे एकूण 2000 मोबाईल फ्युएल स्टेशन्स कार्यरत आहेत.