Mumbai Trans Harbour Link :  MMRDAमार्फत बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अखेर वाहतुकीसाठी सज्ज झालाय. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचे कौतुक होत असतानाच चर्चा रंगली आहे ती येथे केल्या जाणाऱ्या टोल वसुलीची.  शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. या मार्गावर अवजड वाहनासाठी मासिक पास हा तब्बल 79000 रुपये इतका आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सागरी सेतुमुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे. हा सागरी सेतू उभारण्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला हा देशातील पहिला मार्ग ठरणार आहे. या पुलावर कार, टॅक्सी, मिनी बस, हलकी वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करु शकतात. प्रत्येक वाहनाकडून वेगवेगळा टोल आकारला जाणार आहे. त्यानुसार सिंगल, रिटर्न, डेली आणि मासिक पास उपलब्ध करुन दिला जणार आहे. त्यानुसार कार साठी सिंगल टोल हा 250 रुपये आहे. तर, कारसाठी मासिक पास हा 12 हजार रुपयांचा असणार आहे. तर, अवजड वाहनासाठी सिंगल टोल 1580 रुपये तर, मासिक पास काढायला असल्यास तब्बल 79 हजार रुपये मोजावे लागणार आहे. 


विशेष म्हणजे मुंबई-पुणे दरम्यान एसटीच्या शिवनेरीचा प्रवास आता फेसाळणा-या लाटा पाहत पूर्ण करणं शक्य होणारंय. शिवनेरीच्या प्रवासात पनवेलसह इतर लहान-मोठे थांबे नसतील त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास जलद आणि सुकर होईल. अटल सागरी सेतूवर मोटर सायकल, मोपेड, तीन चाकी टेम्पो, रिक्षा, ट्रॅक्टर, ट्रॉलीला परवानगी नाही अले ट्विट मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे. 


अटल सागरी सेतूची वैशिष्ट्ये काय आहेत?


  • देशातील सर्वात मोठा 22 किमी लांब सागरी सेतू

  • मुंबई ते नवी मुंबई 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य

  • 22 किमीच्या सागरी सेतूवरून प्रवासासाठी 250 रुपये टोल

  • मुंबईतून नवी मुंबई, पुणे, कोकणाकडे लवकर जाता येणार

  • अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित

  • सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे

  • वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने कॅमे-यात कैद होणार

  • समुद्रातील लाटा आणि भूंकपाचा विचार करून सेतू तयार

  • शंभर वर्षांपर्यंत सागरी सेतू सुस्थितीत राहणार