रत्नागिरीत मित्राकडूनच गोळी घालून तरुणाची हत्या
आनंद क्षेत्री याचा अधिकृत सावकारी व्यवहार असल्याचं समजतंय
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील उद्यमनगरमधल्या आनंद क्षेत्री नावाच्या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. क्षेत्री याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
क्षेत्री याचा अधिकृत सावकारी व्यवहार असल्याचं समजतंय. तो रविवारी रात्री तीन मित्रांसह चार चाकी गाडीतून जात असताना गाडीतीलच एकाने रिव्हॉल्वरने त्याच्यावर गोळीबार केला. पाठीवर गोळी लागल्यानं त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी संरक्षक भिंतीवर धडकली. क्षेत्री रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.
नर्मदा सिमेंट कंपनीच्याजवळ ही घटना घडलीय. ही घटना घडली त्यावेळी या चौघांनीही मद्यपान केलं होतं... गाडीच्या अपघातानंतर गाडीतील मित्रांनी आरडाओरडा करून स्थानिकांच्या मदतीनं क्षेत्रीला रुग्णालयात दाखल केलं... परंतु, तेव्हापर्यंत उशीर झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.