प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरीतल्या (Ratnagiri) राजापूरमध्ये (Rajapur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  दोन महाविद्यालयीन तरुणींवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात एका तरुणीचा मृत्यू झाला (attack on two college girls one killed). तर दुसरी गंभीर जखमी झाली असून तिला उपाचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. राजापूर तालुक्यातल्या भालावली इथं भीषण घटना घडली. या घटनेने भालावली गावावर शोककळा पसरली असून तणावाच वातावरण निर्माण झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपीला पोलिसांनी केलं अटक
हल्ल्यात साक्षी मुकूंद गुरव (वय 21) ही जागीच मृत्युमुखी पडली असून सिध्दि संजय गुरव (वय 22)  ही गंभीर जखमी झाली आहे. यातील संशयीत हल्लेखोराला नाटे सागरी पोलिसांनी ताब्यात (Accused Arrest) घेतलं आहे. विनायक शंकर गुरव (वय 55, रा. वरची गुरववाडी) असं या संशयीत हल्लेखोराचं नाव असून त्याच्या विरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महाविद्यालयातून घरी येताना हल्ला
साक्षी आणि सिध्दी  या दोघी भालावली वरची गुरववाडी इथं राहणाऱ्या  असून भालावली सिनियर कॉलेज धारतळे इथं शिकत होत्या. बुधवारी महाविद्यालय सुटल्यानंतर त्या सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान नेहमीप्रमाणे आडवाटेने घरी निघाल्या होत्या. याच वाटेवर कमलावली या ठिकाणी संशयीत हल्लेखोर विनायक शंकर गुरव हा दबा धरून बसला होता. त्याने समोरून सिद्धीला येताना पाहिले आणि तिच्यावर दांडक्याने हल्ला केला. 


सिद्धीला वाचवण्यासाठी साक्षी पुढे आली. साक्षी मध्ये आल्याने विनायकने तिच्यावरही दांडक्याने हल्ला केला आणि तिचा गळा आवळला. अचानक हल्ला झाल्याने दोघी भांबावून गेल्या. दोघींनी एकमेकिंना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोराने दांडक्याने जोरदार प्रहार केल्याने आणि गळा दाबल्याने साक्षीचा जागीच मृत्यू झाला. 


याच दरम्यान सिद्धीने जखमी अवस्थेतच तिथूनच मोबाईलवरून घरी संपर्क केला आणि झालेली घटना सांगितली. तोपर्यंत विनायक तिथून पळून गेला होता. हल्ल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी नाटे पोलिसांनी माहिती दिली आणि घटना स्थळी धाव घेतली. जखमी सिद्धीला तात्काळ धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. तिथुन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रत्नागिरी इथं हलवण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत.


साक्षी-सिद्धी जीवलग मैत्रीणी
साक्षी आणि सिध्दी या जीवलग मैत्रीणी होत्या. त्या सोबतच कॉलेजला येत जात असत. आठ दिवसांपुर्वी महाविद्यालयात सारी डे साजरा झाला होता. त्या दोघींनी साडी नेसून सेल्फी काढला होता. तो अखेरचा सेल्फी ठरला आहे. भविष्याची स्वप्ने रंगवत असताना साक्षी हिच्या घातपातामुळे मृत्यु झाल्याने तीच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान या घटनेची नाटे पोलिसांना माहिती देण्यात आली. नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरिक्षक  आबासाहेब पाटील सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विनायकचा शोध घेत त्याला तत्काळ ताब्यात घेतलं.


काय होता वाद
भालावली गुरववाडी इथं गेल्या काही दिवसांपासून भावकीमध्ये वाद निर्माण झाले होते. त्यातून जमिन जुमल्याचेही काही तंटे निर्माण झाले. याबाबत नाटे पोलिसांतही याबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या अशी माहिती पुढे आली आहे. मात्र या मोठ्यांच्या वादात एका निष्पाप युवतीचा हकनाक बळी गेल्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांची जादा कुमक पाचारण करण्यात आली आहे. याप्रकरणी अधीक तपास नाटे सागरी पोलीस  करत आहेत.