रत्नागिरीत 40 टक्क्यांहून अधिक भातशेतीला फटका
भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी सुरुवात
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : क्यार वादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सुमारे 40 टक्क्यांहून अधिक भातशेतीला फटका बसला असेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय. ऐन भात कापणीच्या हंगामातच पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा धास्तावला होता. काहींनी पावसाची विश्रांती मिळाल्यानंतर लगेचच कापणीला सुरवात केली. कापलेले भात मळ्यांमध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यात तरगंत होते. निमगरव्या प्रकारची शेती या तडाख्यात पोळली गेली. मुसळधार पावसामुळे तयार झालेलं भाताचं पिक आडवं झालं आहे.
लोंबीचे दाणे जमिनीवर पडून ते पुन्हा रुजून येऊ लागले आहेत. अशी परिस्थिती कोकण पट्ट्यात प्रथमच उद्भवल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. रत्नागिरीतल्या गावखडी भागात तर गुडगाभर पाण्यात भात कापणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.