प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरच्या नवीन पुलाचा जोड रस्ता मोठ्या प्रमाणावत खचला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात जगबुडी नदीवरील जुन्या पुलाशेजारी हा बांधण्यात आला होता. काही दिवसांत तो वाहतुकीस खुला होणार होता पण त्याआधीच हा जोड रस्ता खचला आहे. या जोडरस्त्याला मोठं मोठे भगदाड पडले असून पुलाच्या संरक्षक भिंतीला देखील तडे देखील गेले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता. जुना ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्याने हा नवीन पूल बांधण्यात आला होता. पण नवीन पुलाची उद्घाटनाआधीच दैना झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जगबुडी नदीवरील जुन्या पुलाची निर्मिती ब्रिटिशांनी १९३१ मध्ये केली. तब्बल ६ वर्ष पुलाच्या निर्मितेचे काम सुरु होते. १९३७ मध्ये हा जुना पूल वाहतुकीस खुला करण्यात येवून त्यावरून वाहने धावू लागली. ११८.२५ मिटर लांब असलेला हा पुल इंग्रजांनी आपल्या कार्यकाळात तयार केलेला उत्तम आणि दर्जेदार बांधकामाचा नमुना आहे. मात्र २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात नवीन पुलाच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर पर्यायी पुलासाठी ६ कोटी ४ लाख ३५ हजार ९९३ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. १० एप्रिल २०१५ रोजी नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.



नवा पूल खुला होण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी बांधकामाचा आढावा घेत या पुलावरून आपली कार नेत ट्रायल देखील घेतली होती. पूल वाहतुकीस योग्य असल्याचा निर्वाळा देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी त्यावेळी दिला होता मात्र पहिल्याच पावसात या पुलाची पुरती वाट लागली आहे...पुलाच्या जोड रस्त्याला पडलेले खड्डे आणि खचलेला रस्ता यामुळे हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचं उघड झाले आहे.