रत्नागिरी : राजापूर तालुक्यात नाणार येथे तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, त्याला विरोध होत असल्याने येथील प्रकल्प रद्द करण्यात आला. मात्र, हा रिफायनरी प्रकल्प व्हावा, या मागणीसाठी रिफायनरी समर्थकांनी आज शहरात मोर्चा काढला. शहरातील मारुती मंदिरपासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. मोर्चात जवळपास दीड ते दोन हजार नागरिक आणि स्थानिकही सहभागी झाले होते. दरम्यान, भाजपने मोर्चाला पाठिंबा दिल्याने आता शिवसेना काय भूमिका घेणार याची उत्सुकता लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातच व्हावा या मागणीसाठी रिफायनरी समर्थकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला. या मोर्चाला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. नाणार संदर्भात जे गैरसमज आहेत ते दूर करून जनतेच्या सहकार्याने नाणार येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनीही त्यावेळी म्हटले होते आणि आता जर यासाठी प्रयत्न होत असतील तर त्याला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा असल्याचे भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी म्हटले आहे.



लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाणार प्रकल्प रत्नागिरीतून हलविण्यात येणार असल्याचे घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेने जल्लोष साजरा केला. आम्ही ग्रामस्थांच्या बाजुने आहोत, असे सांगत या प्रकल्पाला विरोध केला. दरम्यान, निवडणुकीत युती व्हावी आणि शिवसेनेची नाराजी दूर करावी, यासाठी भाजपने हा प्रकल्प गुंडाळण्याच निर्णय घेतला. त्यानंतर हा प्रकल्प रायगड येथे होणार असल्याची चर्चा सुरु होती. तसेच मुख्यमंत्र्यांनीही हा प्रकल्प रायगडमध्ये होईल, असे स्पष्ट केले. मात्र, रायगडमधूनही या प्रकल्पाला विरोध होताना दिसत आहे. असे असताना आता रिफायनरी समर्थकांनी मोर्चा काढला. या मोर्चा भाजपने पाठिंबा दिला. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रत्नागिरीत सुरु आहे.