Ratnagiri Barsu Refinery Project : रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू रिफायनरीसाठी सोमवारपासून पुन्हा सर्व्हे सुरु होण्याची शक्यता आहे. रखडलेला सर्व्हे पुन्हा सुरु होणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. जिल्हा प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे. विरोध पाहता अंदाजे 1500 पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य सरकार सर्व्हे करण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस आणि जिल्हा प्रशासन माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रकल्प व्हावा यासाठी पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत. त्यांनी याआधी प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणाचे काही प्रश्न असतील ते प्राधान्याने सोडविण्यात येतील. तसेच विरोध करणाऱ्यांना समजवण्यात येईल. ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे स्पष्ट केले होते. आता बारसू रिफायनरी प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी पुन्हा सर्व्हे सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, होत असलेला विरोध लक्षात घेता बारसू परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


याआधी हा प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला विरोध असेल तर बारसू, सोलगावमध्ये रिफायनरी असा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार बारसूची निवड करण्यात आली. महाविकास आघाडी सरकार असताना बारसूबाबत केंद्राला पत्रही पाठविण्यात आले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा बारसू रिफायनरी प्रकल्पाला प्राधान्य देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रातील काही प्रकल्प गुजरातला हलविण्यात आल्याने शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे बारसू प्रकल्प सुरु करण्यासाठी हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे.


 राज्य सरकार- आरआरपीसीएलमध्ये चर्चा झाली होती. त्यानुसार नाणारऐवजी बारसू, सोलगावसाठी चाचपणी करण्यात आली होती. रिफायनरीची जागा बदलण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. त्यामुळे नाणारमध्ये विरोध असेल तर बारसू किंवा सोलगावमध्ये रिफायनरी प्रकल्प  उभारला जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकार आणि RCPCLमध्ये चर्चा सुरु होती. दरम्यान,  'रिफायनरीच्या नवीन जागेबाबत MIDC, उद्योगमंत्रालय सकारात्मक असल्याचे चित्र आहे. बारसू - सोलगांवमध्ये रिफायनरीसाठी चाचपणी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित विभागाचे मंत्री देखील याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. मात्र कंपनीला अद्याप अधिकृतपणे कोणताही निरोप नसल्याचं म्हटले जात आहे,


नाणार येथे रद्द झालेली रिफायनरी राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगाव इथं व्हावी यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याविरोधात आता समिती स्थापन झाली आहे. बारसू - सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना असे या संघटनेचं नाव आहे. त्यामुळे आता नवीन जागेवरुन विरोधक आणि समर्थक पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत.



तर दुसरीकडे रत्नागिरीमधल्या रिफायनरी प्रकल्पा संदर्भात  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राजापूरमध्ये रिफायनरी समर्थकांशी चर्चा केली होती. बारसू सोलगाव रिफायनरी व्हावी अशी समर्थकांची आग्रहाची मागणी आहे. बारसू सोलगावात रिफायनरी व्हावी यासाठीचा निवेदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचवला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होऊन तसे केंद्राला कळविण्यात आले होते.