रत्नागिरी: व्हेल माशाची उलटी ही अत्यंत महाग असते. याची तस्करी करणं हा कायद्याने गुन्हा आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेरशेत इथे व्हेल माश्याची 6 किल्लो २०० ग्रॅमची उलटी काही लोकांकडून पकडण्यात आली आहे. याची बाजारात साधारण किंमत 6 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. वन विभागाला या घटनेची माहिती मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन विभागाने तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या रॅकेटमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.


व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभाग आणि पोलिसांची संयुक्तीक कारवाई करण्यात आली. महाड, माणगाव आणि गुहागर येथील आरोपींना अटक करण्यात आली आहे. व्हेल माशाच्या उल्टीची तस्करी करणं हा गुन्हा असल्याने यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 


व्हेल माशाने उल्टी केलेल्या दगडाला का एवढी किंमत?


व्हेल मासा हा जगातला सर्वात मोठा सस्तन जलचर आहे. हा मासा दुर्मिळ होत चाललाय. दुर्मिळ होत चाललेला हा मासा जेवढा अमूल्य आहे तेवढी त्याची उलटीही अमूल्य आहे. परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या एम्बरग्रीससाठी भली मोठी रक्कम मोजण्यासाठीही तयार असतात. 


व्हेल मासा समुद्रात उलटी करतो. त्याच्या उलटीचा पाण्यावर तवंग तयार होतो. हा तवंग घनरूप होऊन दगडासारखा पदार्थ तयार होतो. या दगडाचा वापर ल्युब्रिकेंट तयार करण्यासाठी केला जातो. शिवाय त्यापासून उच्चप्रतिचं अत्तरही तयार होतं.