Mid Day Meal Maharashtra : अ अननसाचा... ब बदकाचा... शाळेत हे असंच शिकवलं जातं. मात्र पोषण आहाराचे कंत्राटदार आहेत की या मुलांना काही वेगळेच धडे देत आहेत.  पोषण आहाराचे कंत्राटदार म्हणतायत ब बेडकाचा... च चिमणीचा... उ उंदराचा.... स सापाचा... पाठ्यपुस्तकांमधून हे धडे मिळत नाहीएत तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना हे धडे मिळतायत.. कारण कधी पोषण आहारात मेलेला उंदीर मिळतो.. कधी याच पोषण आहारात साप मिळतो. तर कधी मेलेली चिमणी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शालेय पोषण आहाराच्या कंत्राटदारांनी पोषण आहारात सर्वच प्राणी सापडतील याची जणू सोयच केलीय.. मग कधी सरपटणारे प्राणी... तर कधी उडणारा पक्षी.. आता तर उड्या मारणारा बेडूकही पोषण आहारात दिलाय.. याआधी पोषण आहारात किडे सापडायचे.. कधी पाली.... मग गेल्या वाटेला कधी झुरळं किंवा अळ्या सापडायच्या.. मात्र आता किड्यांवरुन ही प्रगती चिमणी, साप, बेडूक इथपर्यंत पोहोचली आहे... 


आता सर्वच प्रकारचे प्राणी पोषण आहारात सापडत असल्याने विद्यार्थ्यांना ते याची देही याची डोळा पाहायलासुद्धा मिळतायत.. फक्त पोषण आहाराची पाकिटं लहान असल्याने मोठे प्राणी मात्र सापडत नसल्याची खंत असल्याचा टोला पालकांनी तसंच विरोधकांनी लगावलाय.


हाच पोषण आहार कंत्राटदारांना तसंच सरकारी अधिका-यांच्या घरी पाठवला पाहिजे. म्हणजे त्यांनाही पोषण आहारात मिळणा-या प्राण्यांची ओळख होऊ शकते... निदान त्यानंतर तरी या सरकारी बाबूंचे डोळे उघडतील.. पोषण आहार किती पौष्टिक असतो याची त्यांनाच जाणीव करुन दिली पाहिजे... अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी व्यक्त केलीय.



पोषण आहारात साप, उंदीर, चिमणी आणि बेडूक निघत असतील तर हा पोषण आहार मुलांच्या पोषणासाठी आहे की त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा आहे असा प्रश्न पालकांना पडतोय. सर्वसामान्यांना पडतोय.. मात्र हाच प्रश्न शालेय पोषण आहाराच्या कंत्राटदारांना पडत नाही किंवा सरकारी बाबूंनाही पडत नाही..