रावेर लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?
रावेर... संत ज्ञानेश्वरांची भगिनी संत मुक्ताईची समाधी... देशातलं मोठं रेल्वे यार्ड... महर्षी व्यासांचं मंदिर... तापी, वाघूर नदीचं सानिध्य लाभल्यानं केळीच्या पिकाची बहरलेली बागायती शेती
विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : रावेर... संत ज्ञानेश्वरांची भगिनी संत मुक्ताईची समाधी... देशातलं मोठं रेल्वे यार्ड... महर्षी व्यासांचं मंदिर... तापी, वाघूर नदीचं सानिध्य लाभल्यानं केळीच्या पिकाची बहरलेली बागायती शेती... ही आहेत रावेर लोकसभा मतदारसंघाचं खास वैशिष्ट्यं. निवडक अपवाद वगळता या मतदारसंघात नेहमीच काँग्रेसची पताका फडकत राहिली. मात्र १९९१ पासून आजतागायत या मतदारसंघावर भाजपनं कब्जा केलाय.
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे सध्या रावेरचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतायत. २०१४ च्या निवडणुकीत तत्कालिन खासदार हरिभाऊ जावळे यांचं जाहीर झालेलं तिकीट कापून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली.
बदलत्या राजकीय समीकरणांचा वेध घेत, एकनाथ खडसेंनी त्यासाठी आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावली. मोदी लाटेत रक्षा खडसे प्रचंड मताधिक्यानं विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनीष जैन यांचा ३ लाख १८ हजार मतांनी पराभव केला. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पुन्हा रक्षा खडसेंना उमेदवारी मिळेल असा कयास आहे. पण माजी खासदार आणि रावेरचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांच्यासह आणखी काहीजण इच्छुक आहेत.
रावेर मतदारसंघातील रावेर, यावल, चोपडा, बोदवड आणि जामनेर या पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळं अन्य पक्षांपेक्षा भाजपचं पारडं जड आहे. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना लेवा समाजाची १०० टक्के साथ मिळताना दिसत नाही. येत्या निवडणुकीत आघाडी झाल्यास काँग्रेसकडून पुन्हा डॉ. उल्हास पाटील इच्छुक आहेत. डॉ. पाटील यांचे शैक्षणिक तसंच वैद्यकीय क्षेत्रात असलेलं काम त्यांना निवडणुकीत तारु शकतं. शिवसेनेची भाजपसोबत फारकत झाल्यानं यावेळी सेना देखील ऐनवेळी तगडं आव्हान देण्याच्या तयारीत आहे. सेनेचं प्राबल्य इथं दिसत नसलं तरी भाजपला रोखून धरण्याची ताकद शिवसेनेकडं आहे.
दरम्यान मतदारसंघात जनतेची कामं केल्यानं आपण पुन्हा निवडून येऊ, असा विश्वास खासदार रक्षा खडसेंना आहे.
रावेर मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी जवळजवळ निश्चित समजली जातेय. या जागेवर यावेळी काँग्रेस दावा करणाराय. गेल्यावेळेस अपक्ष म्हणून मैदानात असलेले डॉ. उल्हास पाटील हे पंजाच्या निशाणीवर लढल्यास ते रक्षा खडसेंसमोर तगडं आव्हान उभं करू शकतील. शिवाय सेना भाजप युती तुटल्यास रावेरमध्ये तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
रावेर मतदारसंघाच्या समस्या
गेली अनेक वर्षं भाजपचा खासदार रावेरमधून निवडून येतोय... केंद्रात आणि राज्यातही भाजपचीच सत्ता आहे. पण तरीही इथल्या मतदारांच्या समस्या अजूनही कायम आहेत.
जळगाव जिल्ह्याच्या चोपड्यापासून तर थेट जामनेरपर्यंत विस्तारलेला रावेर मतदारसंघ... यावल, चोपडा आणि रावेर तालुक्याला लागून सातपुडयाच्या महाकाय पर्वत रांगा आहेत. मोठमोठ्या डोंगरावरून वाहून जाणारं पाणी अडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र तसंच मध्यप्रदेश सरकारकडून गेली कित्येक वर्षे सुरु आहे. परंतु सर्वेक्षणापलीकडं या प्रकल्पाचं काम पुढं सरकलेलं नाही. रावेर परिसरात मोठ्या प्रमाणात केळीचं उपन्न घेतलं जातं. जगभरात नावलौकिक असलेल्या केळीमुळंच परिसरात आर्थिक भरभराट नांदत आलीय. मात्र गेली पन्नास वर्षे केळी उत्पादकांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात विद्यमान खासदार रक्षा खडसे कमी पडल्याचा आरोप विरोधक करताय.
रावेरमध्ये केळीचं उत्पादन जास्त घेतलं जात असल्यानं भूगर्भातून पाण्याचा मोठा उपसा होतो. त्यासाठी शाश्वत उपाययोजना होताना दिसत नाहीत. तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना झाल्यापासून सातपुड्याचं वाया जाणारं पाणी अडविण्यासाठी महाकाय जलपुनर्भरण योजना, कुऱ्हा वडोदा, तळवेल उपसा सिंचन योजना, शेळगाव बॅरेज आदी सिंचन प्रकल्पांचं वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना गाजर दाखवलं जातंय.
प्रत्यक्षात ही सगळीच कामं कासवगतीनं सुरु आहेत. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते २०११ साली उदघाटन झालेल्या बोदवड परिसर सिंचन योजनेचं कामही संथगतीने चाललंय. केळीच्या दरात सातत्यानं होणाऱ्या घसरणीमुळं केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग या भागात येऊ शकले नाहीत. कारखानदारी वाढली नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न डोके वर काढतोय. उच्च शिक्षित तरुणांचं प्रमाण या भागात मोठं आहे. स्थानिक पातळीवर नोकऱ्या नसल्यानं परिसरातील तरुण देशविदेशात स्थलांतरीत होताय.
रेल्वे प्रवाशांचे प्रश्न जैसे थे आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडयांना थांबा नाही. उत्तर भारतात रेल्वे वॅगनद्वारा होणारी केळी वाहतूक कित्येक वर्ष ठप्प पडलीय. त्यासाठी खासदारांकडून कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचं केळी उत्पादकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, रस्ते, रेल्वे ब्रिज, गावांतील पायाभूत सुविधा यासाठी खासदार निधीतून कोट्यवधींची कामं केल्याचा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केलाय.
एकनाथ खडसे यांची सून ही रक्षा खडसेंची जमेची बाजू... गेल्यावेळी युवा मतदारांनी भाजपला या भागातून मोठा कौल दिला होता. मात्र युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी गेल्या चार वर्षात एकही मोठा प्रकल्प या परिसरात येऊ शकला नाही. यामुळं युवा मतदारांमध्ये नाराजी आहे. शेतीमालाला भाव नाही, परिसराचा आर्थिक कणा असलेल्या केळीला फळाचा दर्जा मिळालेला नाही. हे सगळेच प्रश्न रावेर लोकसभा मतदार संघात प्रचारासाठी ऐरणीवर असतील.