राजू शेट्टी यांना धक्का, रविकांत तुपकर यांचा राजीनामा
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तुपकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
कोल्हापूर : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तुपकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. आज कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे आपला राजीनामा धाडून दिलाय. आपण लवकरच पुढला निर्णय घेऊ, असे तुपकरांनी जाहीर केले आहे.
महायुतीची सत्ता आल्यावर तुपकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पद सोपवण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली. त्यानंतर तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे होते. दरम्यान, त्यांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
शेट्टी यांनी त्यांना पुन्हा एकदा या निर्णयाबद्दल विचार करावा, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही वेळात तुपकर यांनी थेट राजीनामा पत्र लिहूनच पाठवले. मी अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतु आज मी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे तुपकर यांनी स्पष्ट करत शेट्टींनाच पत्र पाठवले.