उस्मानाबाद : विद्यमान खासदारांना डावलून ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिल्यामुळे उस्मानाबादची शिवसेना ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. उस्मानाबाद येथील शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झालेत. उस्मानाबाद लोकसभेचे तिकीट हे शिवसेनेचे उस्मानाबाद येथील माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना जाहीर झालs आहे. त्यामुळे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांमुळे हे तिकीट कापल्याचा आरोप गायकवाड समर्थकांनी केला आहे. यासंदर्भात गायकवाड समर्थक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर न केल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा यावेळी गायकवाड समर्थकांनी दिला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.