महाराष्ट्रातील `या` बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना रद्द, तुम्हीही खातेधारक आहात का?
RBI Cancels License Of Kolhapur Based Bank: आरबीआयने कोल्हापूर येथील नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळं एकच खळबळ उडाली आहे.
प्रताप नाईक, झी मीडिया,
RBI Cancels License Of Kolhapur Based Bank: इचलकरंजी येथील नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळं सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याचे कारण देत आरबीआयने कोल्हापुरातील जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेन सोमवारी ही कठोर पावलं उचलत मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकेला 4 डिसेंबर 2023 पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर बँकिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे.
कोल्हापुरातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आली असल्याची माहिती रिझर्व बँकेने दिली आहे. रिझर्व बँकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड, इचलकरंजी कोल्हापूर ही येत्या 4 डिसेंबर 2023 पासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देऊ शकत नाही. यासोबतच बँकेत कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास किंवा पैशाचे व्यवहार करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.
बँकेकडे पुरेसं भाग भांडवल आणि कमाईचा साधन नसल्याने सध्याची बँकेची असलेली आर्थिक स्थिती पाहता बँक सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही आणि बँकेला बँकिंग सेवा चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक ग्राहकांवर विपरित परिणाम होईल असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी ऑगस्ट 2023 मध्ये बँकेच्या अध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता.
शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेत पदाचा दुरूपयोग करत नियमबाह्य कर्ज वाटप करून तब्बल 3 कोटी ५८ लाख ३७ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष, त्याची पत्नी व शाखाधिकारी यांच्यासह १९ जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात ऑगस्ट 2023 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता . याप्रकरणी प्रशासक धोंडीराम आकाराम चौगुले (रा. राजारामपुरी कोल्हापूर) यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर लगेचच बँकेचा परवाना रद्द झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.