भीमा कोरेगाव घटनेचे राज्यभरात पडसाद
भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.
मुंबई : भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.
धुळे शहरात आंदोलन
कोरेगावच्या घटनेचे पडसाद धुळे शहरात तिव्रपणे जाणवले. शहरात ठिकठिकाणी संतप्त जमावाने आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. रात्री पाच बसेसवर दगडफेक करण्यात आली असून एका बेकरीची तोडफोड ही करण्यात आली आहे. या आंदोलनांनंतर धुळे स्थानकातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. बस सेवा बंद झाल्याभुळे अनेक प्रवासी बस स्थानकावर अडकून पडले आहेत. आंदोलना दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून, पोलीस या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मनमाडमध्येही बंद पुकारला
भीमा कोरेगांव घटनेचे मनमाड शहरातही पडसाद उमटले असून ,घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंसफुर्तिने बंद पाळल्याने शहरात शुकशुकाट पसरलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी शहरात मोर्चा काढून घटनेच्या निषेध केला. भिमसैनिकावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर शासन करावे अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली .
अहमदनगर जिल्ह्यात निषेध मोर्चा
अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात येतोय. मोठ्या प्रमाणात दलित बांधव रस्त्यावर उतरले आहेत जिल्ह्यातील अहमदनगर मनमाड महामार्गावर राहाता इथल्या शिवाजी चौकात रस्ता अडवुन धरण्यात आलाय.. तसच कोल्हार इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय घटनेच्या निशेधार्थ राहाता बंद ठेवण्यात आलाय. तर मार्केट यार्ड परिसरात किरकोळ दगडफेक करत एसटी बस च्या काचा फोडल्या
अहमदनगर शहरासह भिंगार मध्ये बंद पाळण्यात आलाय. एवढेच नाही तर नगर शहरातील मार्केट यार्ड चौक, दिल्लीगेट, एसटी स्टँड परिसरात दगडफेक झालीये. यामध्ये एसटी बस, लक्झरी गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहे. तर काही ठिकाणी दुकानांवर दगडफेक करण्यात आलीये. दरम्यान याप्रकरणी ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बीडमध्येही निदर्शने
बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, रेस्ट हाऊससमोर, शिवाजी चौक, शासकीय रुग्णालय, बार्शी नाका भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. तीन रिक्षा,चार चारचाकी वाहन आणि अनेक दुकानांचंही नुकसान झालंय, या सर्व घटनेमध्ये पोलीसांचा बंदोबस्त अपुरा पडतोय.
इंदापूरमध्ये रास्ता रोको
भीमा कोरेगाव इथल्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो कार्यकर्त्यानी रस्त्यावर येवून रास्ता रोको केलाय. यामध्ये तालुक्यातील सर्व दलित संघटनांनी सहभाग नोंदवलाय. दोषींवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आलीय.
मुलुंड बंदचं आवाहन
कोरेगावमधील घटनेच्या निषेधार्थ मुलुंडमध्येही आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मुलुंड बंदचं आवाहन केलं. सकाळपासून मोठ्या प्रमाणात आरपीआयचे कार्यकर्ते मुलुंडच्या विविध भागातील रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी एलबीएस रोड पाच रस्ता आणि स्टेशन परिसरात रास्ता रोको केला. स्टेशन परिसरातील शाळा आणि दुकाने या घटनेमुळे बंद करण्यात आली. मुंबई उपनगरात भांडुप, कांजुर, विक्रोळी तसंच घाटकोपरच्या रमाबाई नगर परिसरातदेखील काही भागात वातावरण तणावपूर्ण होते. सध्या संपूर्ण परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.