दिनेश दुखंडे, झी मीडिया, औरंगाबाद : समृद्धी महामार्गामुळे अनेक गावं समृद्धीच्या वाटेवर असताना एका गावात मात्र नैराश्य पसरलंय. रेडीरेकनर दारामुळे जमिनीच्या मोबदल्यातली तफावत त्यास कारणीभूत ठरलीय. या गावात नैराश्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये राजा देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं हे फातियाबाद गाव... गावातले शेतकरी आज अस्वस्थ आहेत... त्याचं कारण समृद्धी महामार्ग... या प्रकल्पाला इथं सुरुवातीला प्रखर विरोध झाला... पण, आता शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी द्यायची तयारी केली असताना गावाचा रेडिरेकनर दर त्यांची डोकेदुखी बनलाय.


समृद्धी महामार्गामुळे या गावात नैराश्य आलंय. कुणी शेतात गळफास लावून ठेवलाय, तर कुणी शेतात आत्महत्येसाठी चिता रचून ठेवलीय. गेल्या २६ जानेवारीला समृध्दीबाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता. फातियाबादमध्ये समृद्धी महामार्गाविरोधात लढा सुरू असला तरी आजूबाजूच्या गावात तशी परिस्थिती आज नाही.


पैशामुळे माणसं एकमेकांपासून दुरावतात हे आतापर्यंत ऐकलं होतं. समृद्धी महामार्गामुळे चक्क गावं एकमेकांपासून दुरावली आहेत. या प्रकल्पाविरोधातील लढ्यात कधी काळी फातीयाबाद आणि माळीवाडा एकमेकांसोबत होते. पण, माळीवाड्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडून जमिनीचे पैसे घेतले... आणि त्यामुळे या गावांमध्ये पूर्वीसारखा संवाद राहिलेला नाही.


माळीवाड्यातल्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गात जात असलेल्या जमिनीचा चांगला मोबदला मिळाला, आणि या प्रकल्पाविरोधातल्या लढ्यातून हे गाव बाहेर पडलं... फातीयाबादमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याबाबत निर्माण झालेला पेच जिल्हास्तरीय समितीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय.


समृद्धी महामार्गामुळे राज्यातले जिल्हे एकमेकांना जोडले जात असताना त्यामधली गावं आणि शेतकरी एकमेकांपासून मनाने तोडले जाऊ नयेत, एवढीच माफक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होतेय.