बंडखोरी हे भाजपचे कारस्थान, उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर घणाघात
CM Uddhav Thackeray`s attack on Rebels MLA : तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचवेळी त्यांनी बंडखोरी मागे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : CM Uddhav Thackeray's attack on Rebels MLA : तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचवेळी त्यांनी बंडखोरी मागे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.
उद्धव ठाकरे हे शिवसेना नेत्यांच्या बैठकीत बोलत होते. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातसुद्धा मी विचार केला नव्हता की मी यापदावर जाईन, त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता. माझ्या मानेत ताण आला. खांद्यापासून पायापर्यंत हालचाल बंद झाली होती. काहींना वाटलं हा बरा होत नाही. काही लोक अभिषेक करत होते. काही देव पाण्यात बुडवून होते. बरा झाला नाही पाहिजे. माझी बोट सुद्धा उघडत न्हवती. मला त्याची परवा नाही, मला आई जगदंबाने ताकद दिली जबाबदारी दिली, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.
'मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणारे पळून गेले'
एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निषाण फडकविल्यानंतर त्यांना शिवसेनेने तात्काळ मोठा दणका दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थक आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली. आता ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? नगरविकास खातं दिलं, माझ्याकडील दोन खाती शिंदेंना दिली, असे सांगत मला सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो, कोण कसं वागलं यात जायचं नाही, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं पाप, माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणं राक्षसी महत्त्वकांक्षा, असा घणाघात केला.
काही जण म्हणत होते, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले. आपल्या सगळ्यांना पुन्हा जिद्दीने पक्ष उभा करण्याचे आवाहन आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत केले. त्याचवेळी ते म्हणाले, ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा, जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं, झाडीची फुलं न्या, फाद्या न्या, मुळ नेऊ शकत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यानी बंडखोरांवर घणाघाती हल्ला चढवला.