COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : आपल्या मर्जीतल्या उमेदवारालाच नोकरी द्यायची असेल तर यंत्रणा कशी वाकवता येते याचा उत्तम नमुना पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळालाय. काय आहे हा भरती प्रक्रियेतला गोलमाल पाहुयात हा रिपोर्ट...!


पिंपरी चिंचवड नगर महापालिकेकडून बहिणाबाई चौधरी हे प्राणी संग्रहालय शहरात चालवण्यात येतं. या संग्रहालयात एनिमल किपर अर्थात प्राणी मित्र जागेसाठी २१ जुलै २०१७ ला मुलाखत घेऊन ८ उमेदवारांची निवड करण्यात आली. पण त्यात मोठा गोलमाल झाल्याची ओरड झाल्याने आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी ती प्रक्रिया रद्द केली! त्यानंतर या महिन्यात १५ तारखेला पुन्हा सात उमेदवारांची प्राणी मित्र पदासाठी निवड करण्यात आली.


धक्कादायक बाब म्हणजे ३४ अर्ज आले असताना ज्या प्रक्रियेत गोलमाल झाला म्हणून ती रद्द करण्यात आली त्यातल्या ५ जणांची निवड करण्यात आलीय.! सात पैकी ५ जण पुन्हा जुन्याच यादीतील कसे असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागलाय.


या प्रकरणी आम्ही सत्ताधारी भाजपला जाब विचारला असता त्यांनी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांना पाचारण करून चांगलेच धारेवर धरले...! आणि या प्रक्रियेत काही गोलमाल असेल तर ती रद्द करू असं आश्वासन दिलंय..!


आता सत्ताधारऱ्यांनी आश्वासन दिले म्हणजे भरती प्रक्रिया रद्द होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. पण एवढ्या साध्या पदासाठी जर असा गोलमाल केला जात असेल तर मोठ्या आणि मोक्याच्या पदासाठी काय केले जात असेल याचा विचार न केलेला च बरा.