52 हजार 690 जणांनी परीक्षा दिली पण सरकारने पद भरतीच केली रद्द; कारण...
जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित” या पदासाठी 20 आणि 21 फेब्रुवार रोजी TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Maharashtra Government Exams : शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश या विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब या संवर्गातील 670 पदे सरळसेवेने भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा 20 आणि 21 फेब्रुवारीला टीसीएस-आयकॉन संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आली होती. पेपरफुटीमुळे परिक्षा रद्द करण्यात आली आहे.
मृद व जलसंधारण विभागातील रिक्त पदासांठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा पेपर फुटला होता. या प्रकरणी काहींना अटक देखील झाली. 52 हजार 690 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे एका परीक्षा केंद्रावर पेपरफुटीचे प्रकरण घडले असले तरी स्पर्धा परीक्षा ही निष्पक्ष, समान संधी उपलब्ध करणारी, संपूर्णत: पारदर्शक असणारी व परीक्षार्थींच्या मनात विश्वास निर्माण करणारी असावी. जेणेकरून उत्तमोतम उमेदवाराची निवड शासन सेवेत होऊ शकेल. एकूण परीक्षेविषयी तसेच त्याच्या कार्यपद्धती व पारदर्शकते विषयी विद्यार्थ्यांच्या मनात शंका नसावी म्हणून ही परीक्षा रद्द करण्याचे निर्णय घेऊन परीक्षा ही नव्याने कशी घ्यावी या बाबत लगेच निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
अमरावतीमध्ये फुटला पेपर
ARN Associate, ड्रिमलँड, नांदगाव पेठ, अमरावती शहर येथील परीक्षा केंद्रावर यश अनंत कावरे या परीक्षार्थीच्या प्रवेश पत्राच्या झेरॉक्स प्रतीवर खालील बाजूस A, B, C, D अशा स्वरुपात उत्तरेसदृष्य माहिती असल्याचे आढळून आले होते. या अनुषंगाने, गृह विभागाच्या अहवालानुसार, नांदगाव पेठ, अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलीस अहवालानुसार आजपावेतो एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये टिसीएस कंपनीचे अमरावती येथील स्थानिक कर्मचारी व त्यांचे प्राधिकृत ARN Associate, ड्रिमलँड, नांदगाव पेठ, अमरावती शहर या ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. सबब, परीक्षा घेणाऱ्या टिसीएस कंपनीतील या परीक्षा केंद्राशी संबंधित काही कर्मचारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यामुळे एकूणच या परीक्षेची विश्वासार्हता व पारदर्शकता यावर काही अंशी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या परीक्षेविषयी परीक्षार्थींच्या मनात संशय निर्माण होण्यास वाव मिळाला आहे. या प्रकरणी अनेक उमेदवारांकडून दिनांक 20 व 21 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करावी व या परीक्षेची प्रक्रिया पुन्हा नव्याने घ्यावी, अशी विनंती शासनाकडे विविध स्तरावर केलेली आहे.
या परीक्षेत झालेला गैरप्रकार प्रथमदर्शनी एका केंद्रापुरता दिसत असला तरी, एकूण परीक्षा कार्यपध्दती व पारदर्शकतेविषयी परीक्षार्थींच्या मनात काही संशय निर्माण करणारा ठरला आहे. या गृह विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंतच्या पोलीस तपासात अटक केलेल्या आरोपींची संख्या, मे. टि.सी.एस (TCS) या कंपनीचे स्थानिक कर्मचारी व त्यांच्या अमरावती शहरातील ARN Associate या प्राधिकृत ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा प्रथमदर्शनी काही अंशी सहभाग आढळून आलेला दिसतो. यामुळे ही परीक्षा रद्द करून फेर परीक्षा घेण्याची परीक्षार्थींची मागणी होती.