रत्नागिरी : Parshuram Ghat will start from today : मुंबई-गोवा महामार्गावरची परशुराम घाटातली वाहतूक आजपासून नियमित सुरु होत आहे. घाटातील चौपदरीकरणाच्या रुंदीकरणासाठी इथली वाहतूक महिनाभर दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. या महिनाभरात ठराविक वेळेत घाटातील वाहतूक बंद ठेवून रुंदीकरणाचे अवघं 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. कंत्राटदार कंपन्यांची मुदतवाढीची मागणी महामार्ग विभागाने नाकारली. आता आजपासून परशुराम घाट नियमित सुरु होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबई-गोवा महामार्गावरील पशुराम घाटात काम सुरु आहे. आता या घाटातून वाहतूक सुरु झाली आहे.


मुंबई-गोवा महामार्ग कोकणवासीयांची आणि वाहतुकीसाठीची लाईफ-लाईन आहे. अनेक वर्ष चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र, आता कुठे कामाला गती मिळत आहे. कोकणवासीयांनी आपल्या मनाशी बाळगलेले स्वप्न केव्हा सत्यात येणार याची  उत्सुकता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम ते आरवली या 34 कि.मी. रस्त्यापैकी 20 कि.मी. रस्ता अपूर्ण आहे. परंतु या टप्प्यात काम वेगाने सुरु आहे. सिंधुदुर्ग मधील बहुतांशी काम समाधानकारक आहे.  


मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील वाहतूक 20 एप्रिलपासून घाटाची दुरुस्ती होईपर्यंत दररोज दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. आता ही वाहतूक आजपासून नियमित करण्यात आली आहे. कोकणात गेलेले चाकरमानी परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या वाहतुकीतील प्रमुख अडथळा दूर झाला आहे.


गेल्यावर्षी परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. यामध्ये एका घरातील तिघांचा मृत्यू झाला होता. यावर्षीचा पावसाळा आता जवळ आला आहे. पावसाळ्यात घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी आतापासूनच जलद गतीने घाटाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. भूस्खलन होऊ नये आणि चौपदरीकरणासाठी सुरू असलेले रुंदीकरण गतीने व्हावे, यासाठी काम हाती घेण्यात आले आहे.