हेमंत चापुडे झी मिडीया, पुणे : राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Election) निकाल शुक्रवारी हाती आले आहेत. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हाती आले आहेत. या निकालानंतर विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे (Pune) जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजय आणि पराभावापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली आहे.


टाकळी हाजी ग्रामपंचायतीच्या निकालानंतर एका लग्नाची चर्चा या गावात रंगली आहे. दामू घोडे प्रतिष्ठानच्या मळगंगा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख उमेदवार दामू घोडे यांनी प्रचार सभेत ही माझी निवडणूक नसून लग्न असल्याचे विधान केले होते.


या विधानानंतर विरोधकांकडून निवडणूक प्रचारात घोडे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. मात्र या निवडणूकीत दामू घोडे यांच्या पॅनेलने माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या पॅनेलचा दारून पराभव केला.


घोडे यांच्या पॅनेलने १६ - १ असा दणदणीत विजय मिळवला आहे. या नंतर  आभार सभेत मतदारांच्या आग्रहानंतर विजयी उमेदवार दामू घोडे आणि अरुणा घोडे या दाम्पत्याचा पुन्हा एकदा विवाह लावण्यात आला.


दरम्यान, या विवाह सोहळ्याची चर्चा जिल्हाभर रंगली असून घोडे दाम्पत्य आता ग्रामपंचायतीमध्ये एकत्र पहायला मिळणार आहे.