२० लाखांपेक्षा जास्त घरं बांधण्याचा CMचा स्वातंत्र्य दिनानिमित्त संकल्प
राज्यात विविध ठिकाणी झालेले ध्वजारोहण
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षभरात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात सरकारनं २० लाखांपेक्षा जास्त सर्वसामान्यांसाठी घरं बांधण्याचा संकल्प केला आहे. त्याकडे राज्य वाटचाल करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथेही झेंडावंदन झालं. मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर डी. के. शर्मा यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. पहिली एसी लोकल लवकरच सुरू होईल, असा विश्वास यावेळी डी. के. शर्मा यांनी व्यक्त केला.
पुणे विधान भवन
पुण्यातल्या विधान भवनात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. खासदार अनिल शिरोळे, आयुक्त कुणाल कुमार, महापौर मुक्ता टिळक हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
औरंगाबादमध्ये ध्वजारोहण
औरंगाबादमध्ये पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण झालं. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना रामदास कदम यांनी मराठवाड्यातल्या दुष्काळीस्थिती बाबत चिंता व्यक्त केली.
नगर पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या विशेष बॅंडसह पोलीस प्रशासनाच्या वेगवेगळ्या पोलीस पथकांनी संचलन केलं. या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षकांसह जिल्ह्यातील अधिकारी आणि नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
अमरावतीत स्वातंत्र्यदिन उत्साहात
विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती इथेही 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण करण्यात आलं. पालकमंत्री प्रविण पोटे यांनी स्वातंत्रसंग्राम सैनिकांना आणि थोर विभुतींना विनम्र अभिवादन करुन सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव : चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
एकाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्र्यांनी पोलिसांची सलामी स्वीकारली. तसच मानकरी पोलीस आणि गुणवंत महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
जळगाव : तिरंगाची मिरवणूक
स्वातंत्र्यदिनाचे औचित्यसाधून जळगावमधील विद्यार्थ्यांनी २०० मीटर आकाराच्या भारतीय तिरंगाची मिरवणूक काढली. शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयातुन शिवतीर्थ मैदानावर या रॅलीचा समारोप करण्यात आला.
रत्नागिरी : ध्वजारोहण
रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी ध्वजारोहण केलं. रत्नागिरीच्या पोलीस ग्राऊंडवर हा सोहळा पार पडला. यावेळी पोलिस दलासह होमगार्ड, शालेय विद्यार्थ्यांनी दिमाखदार संचलन केलं, या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं ते महिला पोलिसांचे संचलन. हा सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती.
नाशिक : विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. झेंडावंदनानंतर गिरीश महाजनांनी विविध सरकारी योजनांची माहिती दिली. जलसंधारण, खत पुरवठा शौचालय बांधणी, वृक्ष लागवड अशा सर्व कामांत नाशिक जिल्हा अग्रेसर असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. झेंडावंदननंतर त्यांच्या हस्ते ऑनलाईन सातबारा प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं.
गोंदिया : थाटात स्वातंत्र्यदिन
गोंदियातसुद्धा मोठ्या थाटात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री राजकुमार बडोलेंनी गोंदिया जिल्हा पोलिस मुख्यालयात ध्वजारोहण केलं. कार्यक्रमात गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी,जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनानी आणि शहरातील सन्माननीय व्यक्ती उपस्थित होत्या.
चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात
चंद्रपूरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पार पडला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ध्वजारोहण करत सलामी दिली. यावेळी त्यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे देशात पहिला प्रयोग असणा-या हॅलो चांदा या पालकमंत्री तक्रार निवारण केंद्राच्या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.