नागपूर: पुलवामा येथे भारतीय सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सरकारने जशास तसे प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते गुरुवारी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात भाष्य करताना म्हटले की, आपण आजपर्यंत खूप गोष्टी झेलल्या, आजचा प्रसंगही तसाच आहे. मात्र, आपण या हल्ल्याला जशास तसे उत्तर देऊ शकतो. यापूर्वी आपण तशी कामगिरी केली आहे. त्यामुळे यावेळी आमच्या अपेक्षा वाढल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूरा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनला लक्ष्य केले. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले आहेत. उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ अवंतीपोरा भागातील गोरीपोरा येथे हा हल्ला झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आम्ही भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पुलवामा हल्ल्यानंतर त्यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी संपूर्ण देश भक्कमपणे उभा आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊ दे, असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.