बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल उशिरा हाती येणार
लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
लक्ष्मीकांत रुईकर, बीड : लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलमधून पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार असे चित्र आहे. दरम्यान राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती यायला मात्र 12 तासांपेक्षा जास्त काळ लागू शकतो कारण या मतदारसंघांमध्ये तब्बल 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते मोजण्यासाठी मोठा वेळ लागू शकतो आणि त्यामुळे अंतिम निकाल रात्री आठ नंतरच हाती येण्याची शक्यता आहे.
ईव्हीएम मशीनद्वारे मतदान झाल्यामुळे गेल्या काही निवडणुकांपासून अवघ्या दोन ते तीन तासात संपूर्ण देशातील चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र बीड लोकसभा मतदारसंघात तब्बल 36 उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यामुळे याठिकाणी 36 उमेदवार आणि सदतीसावा नोटा अशी मतमोजणी केली जाणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 असे 84 टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले असून किमान 27 आणि जास्तीत जास्त 32 मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. या मतमोजणीसाठी 2000 च्या आसपास महसूल विभागाचे कर्मचारी आणि दीड हजाराच्या आसपास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
एकीकडे संपूर्ण देशाचा निकाल आणि चित्र स्पष्ट झाले तरीदेखील बीड लोकसभेचे अंतिम निकाल हाती पडायला 12 तासांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. 'हा कालावधी उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे लागणार असून त्याला प्रशासन काहीच करू शकत नाही.' असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले आहे.