Video : नादखुळा! कृष्णा तीरावर उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांचा थरार
वाहने सरळ दिशेने धावतात. सांगलीत मात्र, उलट्या दिशेने अर्थात रिव्हर्स दिशेने धावणाऱ्या रिक्षा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगलीच्या (Sangali) कृष्णा तीरावर उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांचा थरार (auto rickshaw race) पहायला मिळाला. सांगलीत वारणा आणि कृष्णा संगमावर रिक्षा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
सांगलीतील हरिपूर या ठिकाणी या अनोख्या रिक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हरिपूर वारणा-कृष्णाकाठी या रिवर्स रिक्षा स्पर्धांचा थरार रंगला होता. हरिपूरच्या संगमेश्वर देवाच्या विशाळी यात्रे निमित्ताने या स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शहरातील अनेक रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता. रिव्हर्स रिक्षा स्पर्धा पाहण्यासाठी वारणा-कृष्णासंगमाच्या काठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कमीत कमी वेळामध्ये अंतर पार करण्याच्या या शर्यतीमध्ये रिक्षा चालकांचा थरारक कौशल्य पाहायला मिळाले. उलट्या दिशेने रिक्षा पळवणे अत्यंत कठीण आणि जोखीम असलेला टास्क आहे.या स्पर्धेत भाग घेणारे रिक्षा चालक अनेक दिवस उलट्या दिशेने रिक्षा पळवण्याचा सराव करत असतात.
अत्यंत चुरशीने पार पडलेल्या रिव्हर्स रिक्षा स्पर्धांमध्ये शशिकांत पाटील या रिक्षा चालकाने विजय मिळवला. तीन किलोमीटरचा अवघड वळणाचे अंतर 3 मिनिटं 8 सेकंदात पार करत पाटील यांनी विजेतेपद पटकावला आहे. विजेत्या रिक्षाचालकाला यावेळी रोख रक्कम 11 हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.