मुंबई : दरवर्षी मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गाची पावसाळ्यात दुरवस्था होते. यावेळी कंपन्यांनी आधीच योग्य ती खबरदारी घेण्यासाठी आणि मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण काम किती प्रगती पथावर आहे, याचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात या महामार्गाची दुरवस्था होऊ नये याची दक्षता घ्या, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संबंधिताना दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात आयोजित रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यांतर्गत असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी खबरदारीच्या सूचना केल्यात. तसेच चौपदरीकरण कामाचा या दरम्यान कंपनीनिहाय आढावा घेतला. जी काही कामे रखडली आहेत, ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश  दिले आहेत.


यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी, राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी, विलास चाळके, सचिन कदम तसेच चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.


 महामार्गावर ज्या ठिकाणी घाट तसेच ज्याठिकाणी उतार आहे, त्याठिकाणची कामे लवकरात लवकर पूर्ण करा. महामार्ग दरम्यान संगमेश्वर येथील शास्त्री आणि चिपळूण येथील वाशिष्ठी आदी नद्यांवर ब्रिजच्या कामासाठी साहित्य वाहतुकीस अडचण येत असल्यास वाहतूक परवानंगीसाठी प्रशासनाची मदत घ्या. पूलांचे काम पावसाळापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, अशा सूचनाही मंत्री उदय सामंत यांनी संबधितांना दिल्या आहेत.