विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : तो केनियाचा रहिवासी, शिक्षणासाठी औरंगाबादेत होता. त्यावेळी परिस्थिती जेमतेम, खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली... आणि आता तब्बल तीस वर्षानंतर त्यांनी आपल्या त्याच मदत करणाऱ्या माणसाची पुन्हा भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली. ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबादच्या काशीनाथ गवळी यांच्यासाठी भावनिक आणि खास होती. या भेटीनं साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केनियाचे रहिवासी रिचर्ड टोंगी... रिचर्ड आता केनियाचे खासदार आणि केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. ३० वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये असताना कोणतीही ओळखपाळख नसताना रिचर्ड यांना काशिनाथ गवळींनी घरी आसरा दिला होता. काशीनाथ यांच्याकडून घेतलेली २०० रुपयांची उधारी ते ३० वर्षानंतरही विसरले नाहीत. केनियात गेल्यावर रिचर्ड मोठ्या पदावर पोहोचले. मात्र काशिनाथ यांनी केलेल्या मदतीची कृतज्ञता त्यांच्या कायम राहिली.


काही दिवसांपूर्वी रिचर्ड टोंगी एका शिष्टमंडळासह भारतात आले. त्यांची पत्नी मिशेल टोंगी यादेखेली यावेळी त्यांच्यासोबत होत्या. त्यावेळी त्यांची पावलं आपसुकचं औरंगाबादकडे वळली. दोन दिवस शोध घेत त्यांनी काशीनाथ काकांना शोधून काढलंच.  


रिचर्ड आणि त्यांच्या पत्नीचं गवळी कुटुंबानेही मोठ्या आनंदाने स्वागत केलं. टॉवेल टोपी आणि साडी देऊन त्यांचा आदरसत्कारही करण्यात आला. 


या अनोख्या भेटीमुळे जगात चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा अजूनही बाकी असल्याचे पाहायला मिळालं.