CCTV! नालासोपाऱ्यात रिक्षा चालकाची दादागिरी, ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर घातली रिक्षा
सीसीटीव्हीत रिक्षा चालकाची मुजोरी कैद, मुजोर रिक्षा चालकांना आवरणार कोण?
प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : नालासोपाऱ्यात रिक्षावाल्यांच्या मुजोरपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बेसुमार वाढलेल्या रिक्षा, नाका नाक्यावर असलेल्या युनियन आणि राजकीय पक्षाशी संबंध यामुळे रिक्षावाल्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
आता तर ते वाहतूक पोलिसांनाही घाबरत नसल्याचं चित्र पाहिला मिळतंय. नालासोपाऱ्यात प्रवाशांनी भरलेली रिक्षा अडवणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या अंगावरच रिक्षा चढविल्याचा धक्कादायक प्रकार सीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नालासोपारा पूर्वेच्या उड्डाणपूला जवळ एका रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले असल्याने ती रिक्षा अडविण्यासाठी वाहतूक पोलिसाने रिक्षा चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या रिक्षा चालकाने रिक्षा न थांबविता पोलिसाच्या अंगावरून रिक्षा दमटवीत नेत तेथून पळ काढला. या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रिक्षा चालकाची मुजोरी कैद झाली आहे.
काही रिक्षाचलक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांचावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे सुद्धा दाखल आहेत. रस्त्यावर वाटेल तशा रिक्षा लावल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्मा होते. काही वेळा तर रिक्षावाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळतात. प्रत्येक रिक्षात 3 प्रवासी नेण्याचा नियम असतानाही ४ ते ५ प्रवासी बसवून नेले जातात. अनेक वेळा पोलीस ही या गोष्टीकडे काना डोळा करतात.