परप्रांतीय रिक्षाचालकाची मुजोरी, रुग्णवाहिकेला बाजू देण्यास नकार, व्हीडिओ व्हायरल
रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेला (Ambulance) रस्ता मोकळा करुन दिला जातो. मात्र समाजात असे काही मुजोर मानसिकेतचे लोकं आहेत, जे जाणिवपूर्वक रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन देत नाहीत.
डोंबिवली : रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेला (Ambulance) रस्ता मोकळा करुन दिला जातो. मात्र समाजात असे काही मुजोर मानसिकेतचे लोकं आहेत, जे जाणिवपूर्वक रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन देत नाहीत. असाच काही संतापजनक प्रकार मुंबईनजीकच्या डोंबिवलीत (Dombivli) घडला आहे. हा परप्रांतीय रिक्षावाला कशाप्रकारे अडवणूक करतोय, याचा संपूर्ण व्हीडिओ गणेश तिखंडे या तरुणाने फेसबूकवरुन शेअर केला आहे. या व्हीडिओत एक महिला या माजोरड्या रिक्षावाल्याचा विरोध करतेय. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (rickshaw driver deny to give side for ambulance video goes viral)
या तरुणाच्या पोस्टनुसार, हा व्हीडिओ डोंबिवली पूर्वेतील आहे. डोंबिवली पूर्वेला स्टेशनबाहेरच्या परिसरात नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नसते इतकी रिक्षावाल्यांची गर्दी आणि अनधिकृत फेरीवाल्यांच्या गाड्या असतात. त्यामुळे सर्वसामान्यांना स्थानकाच्या दिशेने येजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तिथे रुग्णवाहिकेला कुठून जागा मिळणार?
रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने खासगी रुग्णालयाने केएम हॉस्पिटलमध्ये रुग्णाला शिफ्ट करावं लागेल असं सागंतिलं. त्यानुसार संबंधित रुग्णाचे नातेवाईक हे रुग्णवाहिकेसह खासगी हॉस्पिटलमधून केएम हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. मात्र या रुग्णवाहिका स्टेशनबाहेरच्या वाहतूक कोंडीत अडकली.
त्यामुळे नातेवाईकांना रिक्षावाल्यांना आणि खासगी वाहनचालकांना वाहनं बाजूला करण्याचं आवाहन केलं. त्यानुसार सर्व वाहनचालकांनी आपआपली वाहनं बाजूला केली.
सर्वांनी रस्ता मोकळा करुन दिला. मात्र या माजोरड्या रिक्षाचालकाने वाट मोकळी करुन देण्यास नकार दिला. "बाकीच्या रिक्षा पुढे जात आहेत. त्या गेल्यानंतर आपोआप जागा होईल",असं उर्मटपणे हा रिक्षावाला बोलताना दिसत आहे. तसेच या व्हीडिओत तो माजोरडा अविर्भावात बोलताना दिसतोय. हा व्हायरल होत असलेला व्हीडिओ विषय संपल्यानंतर काढण्यात आल्याचं यात नमूद करण्यात आलंय.
दरम्यान सोशल मीडियावर या रिक्षावाल्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. नेटीझन्सन अतिशय तीव्र शब्दात या व्यक्तीच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता डोंबिवलीतील स्थानिक आणि वाहतूक पोलीस या रिक्षाचालकाविरोधात कारवाई करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.