नीलेश खरमरे / पुणे : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे धक्कादायक चित्र पुणे जिल्ह्यातील एका गावात दिसत आहे. गावात रस्ता नसेल तर त्या गावची काय परस्थिती होते ते दाखवणारा हा विशेष रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यातील रायदंडवाडीतली. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने गेला महिनाभर रायदंडवाडीत वीज नव्हती. वीजेच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी महावितरणचे उंबरठे झिजवले. अखेर घिसर गावापर्यंत ट्रान्सफॉर्मर आणून देतो पुढे तुम्ही कसं न्यायचं ते न्या असं म्हणत महावितरणनं जबाबदारी झटकली. याचं कारण म्हणजे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही या गावात रस्ता नाही. त्यामुळे गाव प्रकाशमान करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली. 


६५ केव्ही अर्थात सव्वा टन वजनाचा ट्रान्सफॉर्मर डोक्यावर-खांद्यावर नेण्यास सुरूवात केली. घिसर ते रायदंडवाडीपर्यंत जाण्यासाठी दोन तास लागतात. मात्र हा अवाढव्य ट्रान्सफॉर्मर गावात नेण्यासाठी ग्रामस्थांना तब्बल सहा तास लागले. 


रायदंडवाडी गावात तर आणखी गंभीर परिस्थिती पाहायला मिळाली. गावात अजूनही मूलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्या नसल्याचं वास्तव समोर आलं. कुणी आजारी पडलं तर त्याला डोलीवरून जवळच्या गावात न्यावे लागते. या गावात फक्त ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलंच पाहायला मिळतात. हाताला काम नसल्यानं गावातली तरूण मंडळी पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून शहरात गेले आहेत. 


रायदंडवाडीतील हे वास्तव विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहेत. निवडणुका आल्या की इथल्या ग्रामस्थांना आश्वासनं दिली जातात. मात्र त्यानंतर ही आश्वासने हवेतच विरतात. हे वास्तव दाखवल्यानंतर तरी लोकप्रतिनिधी आणि सरकारला जाग येणार का?