आज मध्यरात्रीपासून रिक्षा चालकांचा राज्यव्यापी संप
रिक्षा चालकांच्या मागण्यांबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : रिक्षा चालकांनी आज मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बेमुदत संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन सचिवांनी बोलवलेली बैठक निष्पळ ठरली आहे. त्यामुळे रिक्षा चालक संघटना संपावर ठाम असून आज मध्यरात्रीपासून रिक्षाचा राज्यव्यापी संप सुरू होणार आहे.ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिल्यानंतर
परिवहन सचिवांनी तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात रिक्षा चालक - मालक संघटनांची बैठक बोलवली होती. रिक्षा चालक संघटनेचे नेते शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालक संघटनांचे शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी झाले होते.
रिक्षा चालकांच्या मागण्यांबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. सचिवांनी रिक्षा चालकांच्या मागण्या समजून घेतल्या. मात्र त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. एक महिन्यापूर्वी आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन देऊन संपाचा इशारा दिला होता, मात्र सरकारने उशीरा आम्हाला चर्चेसाठी बोलवले, असा आरोप शशांक राव यांनी केला आहे. ओला, उबेरसह अवैध वाहतुकीवर बंदी घालण्याच्या प्रमुख मागणीसह भाडेवाढ आणि रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीचा समावेश आहे.