योगेश खरे, झी २४ तास, मुंबई : गेल्या चार दशकापसून विस्कळीत असलेल्या रिक्षा वाहतूकीला शिस्त लावण्याचे काम नाशिक शहरात केले जात आहे. शहरात आता शेअर रिक्षाचे दर ठरविण्यात आले आहेत. मीटरप्रमाणे वाहतूक करणे 1 डिसेंबर पासून बंधनकारक करण्यात आल्याने रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी आता शहरातील अनिर्बंध रिक्षा वाहतुकीला योग्य वळण लावण्याचे ठरवले आहे. मीटर वापर करण्याबाबत स्टिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्षा वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी आता शेअर रिक्षा आणि मीटरप्रमाणे रिक्षा अशा दोन भागात वर्गीकरण करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त नाशिक विश्वास नागरे पाटील यांनी म्हटले आहे.  



नाशिकरोड रेल्वेस्टेशन पासून शहरात सीबीएस पर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी तीन प्रवाशांना 59 रुपये घेण्यात येणार आहेत. अशोक स्तंभ ते गंगापूर 45 रु, सीबीएस ते पंचवटी 15 रु. द्वारका ते साधुग्राम 13 रु हे कमीत कमी दर तर नाशिकरोड ते मालेगाव स्टँड निमाणी 75 रुपये अधिकतम दर निश्चित करण्यात आले आहेत. मुंबई ठाणे आणि पुणे या तीनही शहरांच्या तुलनेत सर्वाधिक भाडे दर हा शेअर रिक्षाला नाशिकमध्ये देण्यात आलायं. 


पोलिसांनी उचललेल्या या कठोर कारवाईचे नागरिकांनीही स्वागत केले आहे.  सीबीएस आणि रेल्वे स्टेशन वर प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


पर्यटकांच्या या नगरीत रिक्षा वाहतुकीला शिस्त लावण्याची अतोनात गरज होती. आता या नवीन धोरणाबाबत नागरिकांशी चर्चा करून अधिक चांगले निर्णय घेणे गरजेचे आहे.