सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा, जाणून घ्या दर
Maharashtra News Today: सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे. कांदा-लसणाच्या दरात वाढ झाली आहे.
Maharashtra News Today: सर्वसामान्यांच्या बजेट काही दिवस बिघडण्याची शक्यता आहे. बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळं कांदा ८० रुपये किलोवर तर लसूण ४०० रुपये किलोवर गेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवत आहे. पुढील महिनाभर कांद्याचे आणि तीन – चार महिने लसणाचे वाढ चढेच राहणार आहेत.
दिवाळीनिमित्त नाशिक परिसरात कांद्याची खरेदी – विक्री आठवडाभर बंद होती. त्यामुळे बाजारांत काद्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. किरकोळ प्रमाणात दोन ते पाच टक्के उन्हाळी कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. खरीप कांद्याची काढणी सुरू असतानाच जोरदार पाऊस झाल्यामुळे कांदा सडला आहे. त्यामुळे खरीप कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
खरीप कांद्याची नुकतीच आवक सुरू झाली आहे. बाजारात कांद्याचा तुटवडा असतानाच बांगलादेशाने कांद्यावर लागू केलेला ५० टक्के आयात शुल्क १५ जानेवारीपर्यंत शून्य टक्के केला आहे. त्यामुळे बांगलादेशाला अचानक निर्यात वाढली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून पुणे, मुंबईसह राजधानी दिल्लीत दर्जेदार कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. खरीप हंगामातील नुकताच काढलेला, पाण्याचे प्रमाण जास्त असलेला कांदा ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मुंबईत किरकोळ बाजारात कांदा ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
तीन महिने लसूण तेजीत राहणार
किरकोळ बाजारात लसणाचे दर ४०० ते ४५० रुपये किलोंवर गेले आहेत. लसणाचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. लसणाची रब्बी हंगामात लागवड केली जाते. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात लसणाचे उत्पादन होते. रब्बी हंगामातील लसणाची लागवड आता सुरू झाली आहे. या लसणाची काढणी फेब्रुवारीपासून सुरू होईल. त्यामुळे पुढील तीन – चार महिने लसणाचे दर तेजीत राहणार आहेत.
बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा आणि लसूण संपला आहे. खरीप हंगामातील कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहतील. राज्याबाहेरून होणारी लसणाची आवक थंडावली आहे. रब्बी हंगामातील नवीन लसूण बाजारात येईपर्यंत लसणाचे दर आवाक्यात येणार नाहीत, अशी माहिती पुणे बाजार समितीतील अडते असोशिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.