डोंबिवली : डोंबिवलीत सोनं व्यापाऱ्यावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या कामगारावर हल्ला करणाऱ्या चोरांना नागरिकांनी चांगलाच धडा शिकवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा रोडवर गावदेवी मंदिर परिसरात रमेश गोल्ड नावाचं ज्वेलर्सचं दुकान आहे. या दुकानाचे मालक रमेश नहार हे गुरुवारी रात्री दुकान बंद करून घरी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत दुकानातला माल घेऊन निघालेल्या प्रदीप जैन नामक कामगारावर अचानक दोन जणांनी हल्ला केला.


यावेळी प्रदीपवर गोळीबारही करण्यात आला, मात्र सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. यावेळी झालेल्या झटापटीत त्याच्या डोक्याला दुखापत झाली. 


हा सगळा प्रकार पाहून प्रदीप आणि रमेश नहार यांनी आरडाओरडा केला असता नागरिकांनी धाव घेत दोन्ही लुटारूंना पकडलं आणि बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. याप्रकरणी टिळकनगर पोलीस तपास करत आहेत. 


डोंबिवलीत मागील काही दिवसात अशाप्रकारच्या घटना वाढत आहेत. पोलिसांनी या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून होतेय.