फोडता आलं नाही म्हणून चोरट्यांनी `एटीएम` उखडून नेलं

मंगळवारी मध्यरात्री अर्थात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाला ही घटना घडलीय
अमर काणे, झी २४ तास, नागपूर : नागपूरमध्ये चोरीचा एक अजब प्रकार समोर आलाय. एका एटीएम मशीन फोडण्याच्या उद्देशानं गेलेल्या चोरट्यांना रक्कम चोरता येईना म्हणून त्यांनी अखेर एटीएम मशीनचं उखडून नेलं. नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झालीय. मंगळवारी मध्यरात्री अर्थात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाला ही घटना घडलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या खडगाव रोड इथल्या 'इंडिया नंबर-1'मधलं संपूर्ण एटीएम मशिन जमिनीवरून उखडून चोरट्यांनी लंपास केलंय. चोरीच्या वेळी या एटीएम मशीनमध्ये असलेली सुमारे चार लाख रुपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागलीय.
खडगाव रोडवर इंदिरा नगरजवळ राहणाऱ्या राजू खोब्रागडे यांच्या मालकीच्या भागात गेल्या अनेक वर्षांपासून 'इंडिया नंबर 1' या कंपनीचं एटीएम लावण्यात आले होते. चोरट्यांनी एटीएममधील रक्कम चोरता येत नाही हे लक्षात आल्यावर संपूर्ण मशीनच उखडून नेली. चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.
'एटीएम'मधील सीसीटीव्ही यंत्रणाही चोरट्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.