विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्राला 'ऑटो हब' म्हणून ओळखलं जातं... हेच ऑटो हब आता अधिक वेगवान बनलंय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद शहराच्या औद्योगिकीकरणाची ओळख ऑटो इंडस्ट्री... बजाज ऑटोमुळे ती ओळख जगभर पोहोचली... बजाज, स्कोडा यांसारख्या कंपन्यांमुळे त्यांना पूरक पार्ट बनवणाऱ्या लघू उद्योगाची संख्या ही कमालीची वाढली. वाळूज, शेंद्रा सारखे औद्योगिक क्षेत्र पुढे आले. आता प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 


औरंगाबादमधल्या १० पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये यंत्रमानव २४ तास राबतायत... पूर्वी बजाज कंपनीत दिवसाकाठी १ हजार ६०० ऑटो रिक्षा तयार होत होत्या. आता रोबो तंत्रज्ञानामुळे हा आकडा अडीच हजाराहून अधिक झालाय. ऑटो रिक्षांच्या वेगवेगळ्या लोखंडी पत्र्यांना वेल्डिंगनं जोडण्यापासून ते रंग देण्यापर्यंतची कामं आता रोबो तंत्रज्ञानामार्फत केली जातात. तंत्रज्ञानामुळे उत्पादनाचा दर्जा उंचावलाय. अचूक तंत्रज्ञानामुळे औरंगाबादमधल्या वाळूज औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेली प्रगती पुण्यापेक्षाही अधिक आहे.
 
'ऋचा इंडस्ट्री'मधून बजाज कंपनीला ऑटो रिक्षाचे सांगाडे बनवून दिले जातात. प्रत्येक रोबोला त्याचं काम ठरवून देण्याचा 'प्रोग्राम' दिलेला असतो. काळ, काम आणि वेगाचं गणित त्यामुळे पूर्णत: बदललंय. आता ऑटो रिक्षाच्या उत्पादनाचा वेगही कमालीचा वाढलाय. जेव्हा उद्योग क्षेत्रात मंदीचं सावट होतं तेव्हा तंत्रज्ञानातील बदल औरंगाबादमधल्या उद्योजकांनी स्वीकारले आणि आता मोठा बदल दिसू लागलाय. ऑटो रिक्षा तयार होताना सांगाडे, पेट्रोलच्या टाक्या, रिक्षाचे हँडल, चाक असे वेगवेगळे सुटे भाग वेगवेगळ्या ठिकाणी बनतात. त्याचा वेग रोबोंमुळे वाढलाय.


औरंगाबादेत थेट जपान आणि जर्मनी या दोन देशांतून यंत्रमानव आणले जातात. मध्यम आकाराच्या यंत्रमानवाची किंमत २० ते २५ लाख रुपयांपर्यंत असते. एखाद्या यंत्रमानवानं कसं काम करावं आणि त्याला कुठली आज्ञा द्यायची? याबाबतचं तंत्रज्ञान भारतातील बहुतांश ऑटो क्षेत्रातील कंपन्यांनी स्वीकारलंय. औरंगाबादमध्ये ग्राइंडमास्टर ही कंपनी यंत्रमानावाचे ऑटोमायझेशन करून देते... तर मराठवाडा ऑटोक्लस्टरमध्ये याचं प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्याही वाढलीय. 


केवळ रिक्षाच नाही तर दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे सुटे भागही अशाच पद्धतीनं बनवले जातात. या नव्या तंत्रज्ञानामुळे वेल्डिंगमुळे होणारं अपघाताचं प्रमाण जवळपास शून्यावर आलंय. यंत्रमानव आल्यानं रोजगार कमी होईल का? असा प्रश्न निर्माण होतो. मात्र उद्योजकांच्या मते चांगली लोक मिळत नाही म्हणून रोबोटिक वर्क कडे उद्योजकांचा कल वाढतो आणि येत्या काही वर्षात तो कमालीचा वाढलेला असेल यात शंका नाही...