Rohit Pawar : भाजप नेते आणि लोकसभा खासदार नायब सिंग सैनी (Naib Singh Saini) यांनी मंगळवारी राजभवनात हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी भाजप नेते मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हरियाणात झालेल्या (Harayana Politics) राजकीय घडामोडींची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा लगावला आहे. पोस्ट करत रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजित पवार गटाला टोला लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले रोहित पवार?


हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह करणाऱ्या 'मित्राला' भाजपने शिकवलेला धडा हा महाराष्ट्रातल्या मित्रांसाठी संदेश तर आहेच शिवाय अल्टिमेटम देखील आहे. हरियाणातील राजकीय घडामोड बघता विकासाच्या आणि विचारधारेच्या नावाखाली भाजपसोबत जाणाऱ्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांच्या नेत्यांना 'स्वाभिमान गहाण टाकला की गुलामी पत्करावीच लागते' याचा प्रत्यय आलाच असेल, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.


उद्या लोकसभेसाठी राज्यात सर्वच मित्रपक्षांना कमळाच्या चिन्हावर लढावे लागले तर आश्चर्य वाटू नये, अशी भविष्यवाणी रोहित पवार यांनी केली आहे. असो स्वतःच्या अडचणींमुळे नेते हतबल असले तरी तिकडे गेलेले आमदार मात्र हतबल नाहीत, ते नक्कीच योग्य तो बोध घेऊन सुयोग्य तो निर्णय लवकरच घेतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.


रोहित पवारांनी आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. अनेक महिने आंदोलन करावं लागल्यानंतर अखेर उशिरा का होईना पण राज्य सरकारला जाग आली आणि आशा स्वयंसेविकांच्या मानधनात सरकारने वाढ केली, याबद्दल सरकारचे आभार तसेच सर्व आशा स्वयंसेविका आणि त्यांच्या संघटनेचं अभिनंदन. अशाचप्रकारे अंगणवाडी सेविका, संगणक परिचालक आणि राज्य सुरक्षा कर्मचारी यांच्याही मानधनात वाढ करून त्यांना न्याय द्यावा ही विनंती, असं रोहित पवार म्हणाले आहेत. 


दरम्यान, हरियाणात भाजप आणि दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने मिळून सरकार स्थापन केले होते. दुष्यंत चौटाला हरियाणाचे उपमुख्यमंत्री झाले. जेजेपी आणि भाजपची युती तुटल्याची चर्चा आहे. त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.