Kalyan Crime CCTV : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केलेल्या गोळीबारात शिंदे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्या ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय. अशातच याच प्रकरणावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. विरोधकांनी शिंदे भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असून आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले रोहित पवार?


एक भाजपचा आमदार पोलीस ठाण्यात पीआय समोरच गोळीबार करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या गृहमंत्री पदालाच आव्हान देत आहे. कधीकाळी कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रात हे सरकार आल्यापासून गुंडाराज सुरू झालं, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.


देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचाच आमदार तुम्हाला न जुमानता पोलीस ठाण्यात गोळीबार करून कायद्याच्या चिंधड्या उडवत असेल तर एक क्षणही गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार आपल्याला नाही! राजीनामा द्या, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.



जयंत पाटील म्हणतात...


पुण्यात दिवसाढवळ्या हत्या होत आहेत, कोयता गँगचा उच्छाद सुरुच आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही कधी हत्या होते तर कधी गोळीबार. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात काल उल्हासनगर येथे घडलेली फायरिंगची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमदारांनीच पोलिसांसमोर गोळीबार करावा आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये हे अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात या पूर्वी असे कधी घडत नव्हतं.


महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना नेमकं कोण पाठीशी घालत आहे असा मोठा प्रश्न आज राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. साधुसंतांची भूमी म्हणून ओळख असणारे आपले महाराष्ट्र राज्य, गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जावू नये ही भीती आहे. कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा ? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय.