`वेगळ्या घरात लोक किती दिवस एकत्र राहतील हे..`, `सुनेत्रा काकी`चा उल्लेख करत रोहित पवारांचं विधान
Rajaya Sabha Election 2024: अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासंदर्भातील संभ्रम अखेरच्या दिवशी अगदी सकाळपर्यंत कायम असल्याचं चित्र दिसत असतानाच रोहित पवारांची पोस्ट
Rohit Pawar on Sunetra Pawar राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा म्हणजेच 13 जून हा शेवटचा दिवस आहे. असं असतानाच अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून राज्यसभेसाठी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढलेल्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तसेच रायगडचे नवनियुक्त खासदार सुनिल तटकरेंनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील संकेत दिले. मात्र अजित पवार गटाकडून नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाणार यासंदर्भातील संभ्रम कायम आहे. असं असतानाच रोहित पवार यांनी एक सूचक विधान केलं आहे.
ही नावं चर्चेत
अजित पवार गटाकडून राज्यसभेची उमेदवारी कोणाला दिली जाणार यासंदर्भात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अजित पवारांचं मूळ गाव असलेल्या बारामतीमधील काटेवाडीच्या ग्रामस्थांनी सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करणारं पत्रकच दिलं आहे. दुसरीकडे पार्थ पवार यांनी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने ते सुद्धा या जागेसाठी उत्सुक असल्याचं समजतं. तसेच नाशिकचे आमदार आणि पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं देशील नाव संभाव्य उमेदवारांमध्ये घेतलं जात आहे. मात्र पक्षाकडून यासंदर्भात कोणत्याही नावाची अद्याप (हे वृत्त देईपर्यंत) घोषणा करण्यात आलेली नाही. असं असतानाच रोहित पवारांनी कोणाचाही थेट उल्लेख न करता टोला लगावला आहे.
नक्की वाचा >> 85000 कोटींच्या 'या' प्रकल्पामुळे महायुतीने 12 जागा गमावल्या? आता सत्ताधाऱ्यांचाच विरोध
रोहित पवार काय म्हणाले?
"आदरणीय पवार साहेबांना (शरद पवारांना) सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा सुरू आहे. म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन!" अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे. आता या माध्यमातून त्यांना नेमका कोणावर निशाणा साधायचा आहे हे स्पष्ट झालेलं नसलं तरी त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.
मंत्रिपद नाकारलं
मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या कॅबिनेटमध्ये अजित पवार गटाला राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र अजित पवार गटाने कॅबिनेट मंत्रिपदच हवं अशी भूमिका घेतल्याने त्यांना सध्या तरी कोणतंही पद देण्यात आलेलं नाही. अशातच आता राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार यासंदर्भातील घोषणा लवकरच केली जाईल.