`बसायचंच असेल तर...` रोहित पवारांचा गर्दी करणाऱ्या तळीरामांना सल्ला
लॉकडाऊनमध्ये ४० दिवसांनंतर अखेर दारूविक्री करणाऱ्याला राज्य सरकारने परवानगी दिली.
मुंबई : लॉकडाऊनमध्ये ४० दिवसांनंतर अखेर दारूविक्री करणाऱ्याला राज्य सरकारने परवानगी दिली. रेड झोनमध्येही अटींसह दारूविक्रीला मंजुरी देण्यात आली. ४० दिवसांनंतर दारू मिळणार असल्यामुळे तळीरामांनी सकाळपासूनच वाईन शॉप्सच्या बाहेर गर्दी करायला सुरूवात केली. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोल्हापूरमध्ये तर दारू मिळवण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. नाशिकमध्ये पोलिसांना तळीरामांवर लाठीने मारावं लागलं.
दिवसभरातील राज्यातली ही परिस्थिती बघितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तळीरामांना सल्ला दिला आहे. 'सरकारने अनेक दुकानांना परवानगी दिली, पण विशिष्ट दुकानांपुढेच लागलेल्या रांगा पाहून वाईट वाटलं', असं रोहित पवार म्हणाले आहेत.
'मित्रांनो... जीवनमरणाचा प्रश्न आहे. आज घरात बसा. तुम्हाला 'बसायचंच' असेल तर 'घरच्या' परवानगीने पुढे आयुष्यभर निवांत 'बसता' येईल ना!' एवढी घाई का करताय? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
तळीरामांनी दारू मिळवण्यासाठी गर्दी केल्यामुळे नाशिकमध्ये अनिश्चित काळासाठी दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तर औरंगाबादमध्येही दारूची दुकानं उघडली नसल्यामुळे मद्यप्रेमींचा हिरमोड झाला. राज्य सरकारने घेतलेल्या दारूविक्रीच्या या निर्णयाचा सामाजिक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.