`दिल्लीतली लायकी मात्र...`, बजेटवर बोलताना रोहित पवारांची फडणवीसांना सणसणीत टोला
Maharastra Politics Over budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारने बजेट सादर केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर केला. त्यावर आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) जोरदार टीका केली आहे.
Rohit Pawar On Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी 2024-25 चा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करताना बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी मोठ्या निधीची घोषणा केलीये. तर महाराष्ट्राच्या पदरी मात्र निराशाच पसरलीय. बजेटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशवर पैशांचा पाऊस पाडलाय. देशात तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना मोदींनी रिटर्न गिफ्ट दिलंय. त्यामुळे आता केंद्र सरकारवर टीका होताना दिसत आहे. अशातच रोहित पवार यांनी देखील बजेटवर बोलताना महाराष्ट्रातील नेत्यांवर टीका केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक देणारे भाजपा सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल ही अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने भाजपा सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील हवेचा अंदाज आला असेल आणि तसा अहवाल नुकताच महाराष्ट्रात येऊन गेलेल्या गृहमंत्र्यांनी दिला असेल. पवार साहेबांवर परवा झालेले आरोप महाराष्ट्रातील याच हवेचे द्योतक होते, असं म्हणत रोहित पवारांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
यंदाचं हे बजेट केवळ बिहार आणि आंध्रप्रदेश साठी होते का? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल तरी बिहार आणि आंध्रच्या नेत्यांनी केलेल्या बारगेनिंग आणि पाठपुराव्याचे हे फलित म्हणावे लागेल. कदाचित महाराष्ट्राच्या नेत्यांनी देखील केवळ खुर्चीसाठी बार्गेनिंग न करता महाराष्ट्र हितासाठी थोडा जरी पाठपुरावा केला असता तर महाराष्ट्रासाठी एखादी घोषणा झाली असती, असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
दरम्यान, या बजेटने महाराष्ट्राला काही दिलं नसलं तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.