अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारल्याचा मुद्दा सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी फार काही बोलण्यास नकार दिला. त्यांनी इतकेच म्हटले की, पवार साहेब पार्थला जे काही बोलले, तो कौटुंबिक विषय आहे, राजकीय नाही. 
याशिवाय, पद्म पुरस्कार समितीवर नियुक्ती झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेलाही रोहित पवार यांनी  प्रत्युत्तर दिले. त्यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली. आदित्य ठाकरे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड होणे, ही चांगली बाब असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतरही पार्थ पवारांची नाराजी कायम

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाची सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्य सरकारची चांगलीच गोची झाली होती. यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारले होते. पार्थ पवार अपरिपक्व आहेत. त्यांच्या मताला मी काडीचीही किंमत देत नाही, असे पवार यांनी म्हटले होते. या वक्तव्यामुळे अजित पवार आणि पार्थ पवार प्रचंड दुखावले गेल्याचे समजते. त्यामुळे पवार कुटुंबात अंतर्गत कलह निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत असले तरी अजित पवार आणि पार्थ पवार यांनी अद्याप जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष पार्थ पवार यांच्या भूमिकेकडे लागले आहे. 


राष्ट्रवादीमध्ये बैठकांच्या मालिका


शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीमध्ये बैठकांच्या मालिका सुरू झाल्या. बुधवारी शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर काहीच वेळात अजित पवार सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचले. तिकडे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची बैठक झाली. यानंतर काल म्हणजेच गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली.

काल संध्याकाळी सव्वा दोन तास पार्थ पवार हे सिल्व्हर ओकवर गेले. तिकडे सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांचं मन वळवण्याचाही प्रयत्न केला. तर आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार समर्थक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सुनिल तटकरे, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे हे नेते शरद पवारांच्या भेटीला गेले होते.